लखनौ - उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला झालेल्या भीषण अपघातात 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, तर 7 विद्यार्थी जखमी झाले आहेत. सदर व्हॅन रेल्वे फाटक क्रॉस करत असताना ट्रॅकवरून भरधाव वेगात येत असलेल्या पँसेंजरची धडक बसून हा अपघात झाला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. गुरुवारी सकाळीच तयारी करून शाळेला निघालेल्या विद्यार्थ्यांवर शाळेच्या वाटेवर असतानाच काळाने घाला घातला. डिव्हाइन पब्लिक स्कूलची टाटा मॅजिक गाडी सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत निघाली होती. ही व्हॅन दुदही रेल्वे फाटकावर आली असतानाच ट्रॅकवरून थावे-बढनी पँसेंजर येत होती. त्याचवेळी व्हॅनच्या चालकाने ट्रँक ओलांडण्याचा प्रयत्न केल्याने पॅसेंजरची धडक व्हॅनला बसली. या धडकेने व्हॅनचा चेंदामेंदा झाला. तर व्हॅनमधून प्रवास करणाऱ्या 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच व्हॅन चालकाचाही या अपघातात मृत्यू झाला. अपघाताचा आवाज आणि मुलांचा आक्रोष ऐकल्यानंतर जवळपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या चौकशीसाठी एका तपास समितीची स्थापना करण्यात आली आहे.
व्हॅनची पॅसेंजरला धडक, उत्तर प्रदेशातील भीषण अपघातात 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 8:26 AM