ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 30 - भावासोबत रिमोटवरुन झालेल्या भांडणानंतर 13 वर्षाच्या चिमुरडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादमधील निजामपेठमध्ये ही दुर्देवी घटना घडली आहे. ज्योत्स्ना असं या आत्महत्या केलेल्या चिमुरडीचं नाव आहे. ज्योत्स्नाचे वडिल प्रकाश एका खासगी कंपनीत कामाला असून आई विमला गृहिणी आहे. हे सर्वजण निजामपेठमधील राजीव गृहकल्प कॉलनीत राहतात.
ज्योत्स्ना सातवीत शिकत होती. रविवारी रात्री ज्योत्स्नाची आई जेवणाची तयारी करत असताना तिचं आपल्या मोठ्या भावाशी भांडण झालं. ज्योत्स्नाचं भाऊ प्रवीणसोबत (16) टीव्ही रिमोटवरुन भांडण सुरु होतं. भावाने रिमोट देण्यास नकार दिल्यानंतर चिडलेली ज्योत्स्ना तशीच आपल्या बेडरुममध्ये निघून गेली आणि गळफास लावून आत्महत्या केली.
खूप वेळ झाला तरी ज्योत्स्ना दरवाजा उघडत नसल्याने आई - वडिलांना चिंता लागली. त्यांनी फोन करण्याचाही प्रयत्न केला. पण काहीच उत्तर येत नसल्याचं पाहून अखेर त्यांनी दरवाजा तोडून पाहिलं तर ज्योत्स्नाचा मृतदेह लटकलेला होता. तात्काळ तिला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यत तिचा मृत्यू झाला होता. आत्महत्या करण्याआधी ज्योत्स्नाने कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नव्हती. पोलिसांनी कलम 174 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.