चेन्नई, दि. 24 - कांचीपुरम येथून एका आठवड्याभरापुर्वी 13 वर्षाच्या मुलीची सुटका करण्यात आली होती. या मुलीने 20 वर्षीय तरुणाशी लग्न केलं होतं. मुलीची सुटका करण्यात आल्यानंतर एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ही मुलगी 12 आठवड्यांची गर्भवती आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणताही एफआयआर दाखल केलेला नाही. मुलीचा गर्भपात न केल्यास तब्बेत बिघडण्याची भीती असून बाल कल्याण समितीने तिच्या आईकडे यासंबंधी परवानगी मागितली आहे.
गुरुवारी पीडित मुलीची आई बाल कल्याण समितीसमोर हजर झाली होती. बाल कल्याण समितीने मुलीचा गर्भपात करावा यासाठी परवानगी मिळवण्यासाठी तिच्या आईला बोलावलं होतं. 'पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या आई, वडिलांची परवानगी घेणं गरजेचं असल्याचं', बाल कल्याण समितीचे अध्यक्ष आरएन मणिकंदन यांनी सांगितलं आहे.
मुलगी नऊ महिने गर्भवती राहिल्यास तिच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. सुरुवातीला गर्भपात करण्यास मुलीची आई नकार देत होती. मात्र नंतर त्यांची समजूत काढल्यानंतर तयारी दर्शवली. 'मात्र ज्या सरकारी रुग्णालयात मुलीची तपासणी करण्यात आली होती, त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही गर्भपात करु शकत नाही', अशी माहिती आरएन मणिकंदन यांनी दिली आहे.
सध्या मुलीला सरकारच्या देखरेखेखाली ठेवण्यात आलं आहे. 12 ऑगस्टला सरकारी रुग्णालयात मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. यावेळी डॉक्टरांनी जिल्हा बाल सुरक्षा अधिका-याला मुलगी गर्भवती असल्याची माहिती दिली होती. यानंतर दुस-याच दिवशी मुलीला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आलं होतं.
काही वर्षांपुर्वी मुलीने शाळा सोडली होती. नंतर आपल्याच एका नातेवाईकासोबत तिने लग्न केलं होतं. मुलीचे आई-वडिल मजूर आहेत. मुलीच्या लग्नामध्ये आई-वडिलांची कोणतीच भूमिका नाही अशी माहिती बाल कल्याण समितीने दिली आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतरच मुलीचा गर्भपात करण्यात येणार आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पोलिसांनी अद्याप याप्रकरणी कोणताच एफआयआर दाखल केलेला नाही.