नवी दिल्ली : बलात्कारामुळे गरोदर राहिलेल्या मुंबईतील १३ वर्षांच्या विद्यार्थिनीचा ३१व्या आठवड्यात गर्भपात करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मुभा दिली. जे. जे. इस्पितळात शुक्रवारी गर्भपात होणे अपेक्षित आहे.१३ वर्षांची मुलगी आई कशी काय होऊ शकते, असा प्रश्न अचंब्याने विचारणारे सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांच्यासोबत न्या. अमिताभ रॉय व न्या. अजय खानविलकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. चारकोपमधील आठवीमध्ये शिकणाºया मुलीचा गर्भ सात महिन्यांचा झाल्यावर, ती गरोदर असल्याचे पालकांच्या आॅगस्टमध्ये लक्षात आले. गर्भाची एवढी वाढ झाल्यानंतर गर्भपातास कायद्याने बंदी असल्याने, तिने पालकांमार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका केली. न्यायालयाने मुलीची तपासणी करून अहवाल देण्यास जे. जे. इस्पितळातील डॉक्टरांच्या मेडिकल बोर्डास सांगितले.बोर्डाने गेल्या आठवड्यात दिलेल्या अहवालात गर्भ यापुढे वाढू देण्याने आई व जन्मणारे मूल दोघांनाही गंभीर धोका संभवू शकतो. या टप्प्याला गर्भपातामुळे मुलीला खूप शारीरिक त्रास होऊ शकतो, पण गर्भपात करायचाच असेल, तर तो आत्ताच केला जाऊ शकतो. नववा महिना सुरू झाल्यावर गर्भपात केल्यास अपुºया दिवसांचे, पण जिवंत मूल जन्माला येण्याची शक्यता आहे. अशा नाजूक मुलाला जगविण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागेल, असे म्हटले होते.हा अहवाल लक्षात घेऊन खंडपीठाने नमूद केले की, मुलीचे वय, बलात्कारामुळे तिच्यावर झालेला मानसिक आघात व वाट्याला आलेल्या गरोदरपणामुळे सोसावे लागणारे शारीरिक व मानसिक क्लेष पाहता, तिला गर्भपात करण्याची परवानगी देणे न्यायाचे होईल, असे आम्हाला वाटते. गरोदर असल्याचे कळल्यापासून मुलगी मनाने उद््वस्त झाली आहे, असे सांगून याचिकाकर्तीच्या वकील अॅड. स्नेहा मुखर्जी यांनी गर्भपात करू देण्याचा आग्रह धरला. केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यास विरोध केला नाही. मात्र, सर्वसाधारणपणे ३६-३७ व्या आठवड्यांत प्रसूती होते व या प्रकरणात ३१ आठवडे होऊन गेले आहेत, असे सांगून त्यांनी संभाव्य धोक्याकडे लक्ष वेधले.वडिलांचा नराधम भागीदार-या मुलीचे वडील फेरीवाला म्हणून व्यवसाय करतात व आई घरकाम करते. वडिलांचा २३ वर्षांचा धंद्यातील भागीदार त्यांच्याच घरात राहात असे. त्यानेच या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचे उघड झाले. तो अटकेत आहे. ही मुलगी अचानक लठ्ठ होऊ लागली.थायरॉईडमुळे असे होत नसावे ना, या शंकेने सोनोग्राफी केली, तेव्हा ती २७ आठवड्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. काही दिवस मुलीला भायखळा येथील ‘आशासदन’मध्ये ठेवण्यात आले होते. तेथून २३ आॅगस्ट रोजी सोडल्यानंतर गर्भपात करून घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या.आधीपेक्षावेगळा निकालन्यायालयाने याआधीही २४हून अधिक आठवड्यानंतर गर्भपाताची परवानगी अनेक प्रकरणांत दिली होती. परंतु त्या गरोदर स्त्रिया विवाहित होत्या व गर्भातील जीवघेणे व्यंग हे निकालांचे कारण होते. आताचा निकाल मात्र आई व बाळ यांच्या जिवाला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन दिला गेला.दोन महिन्यांपूर्वी न्यायालयाने चंदीगड येथील १० वर्षांच्या बलात्कारित मुलीस गर्भपातास परवानगी नाकारली. काही दिवसांपूर्वी या मुलीची सिझेरियन शस्त्रक्रियेने प्रसूती झाली. तिला झालेली मुलगी दत्तक दिली जायची आहे. स्त्रियांच्या व विशेषत: बलात्कारितांच्या सहा महिन्यांहून अधिक काळानंतरच्या गर्भपातांवर, वेळ न घालवता निर्णय घेता यावा, यासाठी राज्यांनी कायमस्वरूपी ‘मेडिकल बोर्ड’ नेमण्याची सूचनाही न्यायालयाने केली होती.
१३ वर्षांच्या बलात्कारित मुलीस गर्भपाताची मुभा, सुप्रीम कोर्टाचा दिलासा : शारीरिक व मानसिक क्लेषातून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:06 AM