नवी दिल्ली : कर्करोग हा भारतातील सर्वांत मोठा प्राणघातक रोग ठरला असून, या रोगामुळे दररोज १३०० नागरिकांचा बळी जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राणघातक रोगात कर्करोगानंतर टीबीचा क्रमांक आहे. राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या कर्करोग कार्यक्रमाने दिलेल्या माहितीनुसार २०१२ ते २०१४ या दोन वर्षांत कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूत सहापट वाढ झाली आहे. २०१४ साली कर्करोगामुळे देशात जवळपास ५ लाख मृत्यू झाले आहेत असे एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. २०१४ साली कर्करोग झालेल्या २८,२०,१७९ लोकांपैकी ४,९१,५९८ लोक मरण पावले. २०१३ साली २९,३४,३१४ लोकांना कर्करोगाची बाधा झाली, त्यापैकी ४,७८,१८० लोक मरण पावले. २०१२ साली ३०,१६,६२८ लोकांना कर्करोग झाला व त्यातील ४,६५,१६९ लोक मरण पावले. आयुर्मान वाढल्यामुळे उतारवयातील लोकांना येणाऱ्या समस्या, अयोग्य जीवनशैली, अयोग्य आहार, रोग झाल्यानंतर लवकर न कळणे अशा अनेक कारणांमुळे कर्करोग झालेल्या लोकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. २०१३-१४ साली सरकारने कर्करोगावर तज्ज्ञ सल्ला देण्याची सुविधा, तसेच कर्करोगावरील उपचाराचे मार्गदर्शन देण्याची सुविधा सुरू केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)