नवी दिल्ली - जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन असलेले गुगल भारतीय बाजारपेठेत ऑनलाइन सर्चमध्ये अनुचित पद्धतीने व्यवसाय करीत असल्याने कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) गुगलला 136 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम गुगलला येत्या साठ दिवसांत भरावयाची आहे. याबाबत 2012 साली गुगलविरोधात सीसीआयकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यात गुगल हे ऑनलाइन सर्चमध्ये पक्षपातीपणे निकाल दाखवत असल्याची मुख्य तक्रार होती. गुगल इंडिया प्रा. लि., गुगल एलएलसी, गुगल आयर्लंड लि. यांच्या विरोधात मॅट्रिमोनी डॉट कॉम, कन्झुमर युनिटी अँड ट्रस्ट सोसायटी यांनी 2012 साली सीसीआयकडे तक्रारी केल्या होत्या.
काय आहे संपूर्ण प्रकरण?जागतिक पातळीवर पहिल्यांदाच गुगलवर अशा प्रकारे दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय बाजारपेठेत ऑनलाइन सर्चमध्ये गुगलनं अनुचित पद्धतीने भेदभाव आणि अफरातफर केल्याला आरोप आहे. गुगलच्या या भेदभावामुळे अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांना तोटा सहन करावा लागला आहे. सीसीआयनं एकूण 135.86 कोटींचा दंड ठोठावला आहे. हा दंड 2013, 2014 आणि 2015 मधील ऑपरेशनल इन्कमच्या पाचपट आहे. गुगलच्या थातूरमातूर स्पष्टीकरणानंतर त्यांच्यावर अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. गुगलला ही दंडाची रक्कम 60 दिवसांच्या आत भरावी लागणार आहे.