- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
संसदेचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी समाप्त झाले त्याचबरोबर संसदेचे कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित झाले. भारताच्या करसुधारणांमधे स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक लक्षवेधी ठरलेले वस्तू व सेवा कराबाबतचे (जीएसटी) १२२ वे घटना दुरूस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर झाले आणि त्यातील दुरुस्त्यांसह लोकसभेनेही ते संमत केले. या २0 दिवसांच्या अधिवेशनात लोकसभेत १४ विधेयके सादर झाली त्यापैकी १३ मंजूर झाली तर राज्यसभेत १४ विधेयके मंजूर करण्यात आली. उभय सभागृहांत प्रत्येकी २0 दिवसांच्या कामकाजात लोकसभेत १२१ तास तर राज्यसभेत ११२ तास कामकाज झाले. लोकसभेत जी महत्त्वाची विधेयके मंजूर झाली, त्यात मेडिकल कौन्सिल दुरूस्ती विधेयक, दंतचिकि त्सक दुरूस्ती विधेयक, बालमजुरी प्रतिबंधक तथा नियमन दुरुस्ती विधेयक, बेनामी व्यवहार प्रतिबंधक विधेयक, कर्जवसुली दुरुस्ती विधेयक, कर्मचारी नुकसान भरपाई दुरुस्ती विधेयक, कराधान व कारखान्यासंबंधी दुरुस्ती विधेयकांचा समावेश आहे.राज्यसभेत मंजूर झालेल्या प्रमुख विधेयकांमधे प्रसुती रजा लाभ दुरुस्ती विधेयक, मनोरूग्णांच्या सुविधा व अधिकाराबाबतचे दुरुस्ती विधेयक, याखेरीज अर्थ, श्रम व रोजगार, कृषी व शेतकरी कल्याण, आरोग्य व कुटुंब कल्याण, मनुष्यबळ विकास, पर्यावरण, वने व क्लायमेट चेंज, पेन्शन, सामाजिक न्याय, विज्ञान तंत्रज्ञान या मंत्रालयांतर्फे सादर झालेली विविध विधेयकेही मंजूर करण्यात आली.काश्मीरमधील तणाव व सद्यस्थितीबाबत उभय सभागृहात गंभीर वातावरणात चर्चा झाली. काश्मिरी जनतेला शांततेचे आवाहन करीत सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त करणारा एक प्रस्तावही या संदर्भात दोन्ही सभागृहांनी एकमताने मंजूर केला. याखेरीज दलित अत्याचाराच्या घटना, महागाई, विभाजित आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा विषय, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निकालांबाबत राज्यपालांच्या भूमिकेविषयी चर्चा, नव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा, हवाई दलाचे बेपत्ता विमान, गृहमंत्र्यांचा पाकिस्तान दौरा इत्यादी विषयांबाबतही अल्पकालिन चर्चा, विशेष उल्लेख, लक्षवेधी सूचनांद्वारे चर्चा झाल्या.लोकसभेत ४00 तारांकित प्रश्नांपैकी ९९ प्रश्नांची उत्तरे संबंधित मंत्र्यांनी सभागृहात दिली. उर्वरित ३0१ तारांकित व ४६00 अतारांकित प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरूपात पटलावर ठेवण्यात आली. राज्यसभेत ३00 तारांकित प्रश्न व ३३३ उपप्रश्नांना उत्तरे देण्यात आली व सदस्यांनी १२0 विषय शून्यप्रहरात उपस्थित केले. यापैकी २१ विषयांना मंत्र्यांनी लगेच उत्तरे दिली. ९१ विषय विशेष उल्लेखाद्वारे मांडले. लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन व राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्या भाषणानंतर संसदेचे कामकाज संस्थगित झाले.