भोपाळ : मध्य प्रदेशातील रीवा येथे आज पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. रीवा येथे शनिवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ता अपघातात बस आणि ट्रकसह तीन वाहनांची धडक झाली. बस आणि ट्रकच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस हैदराबादहून लखनौला जात होती. या बसमध्ये 100 हून अधिक प्रवासी होते आणि मृतांपैकी बहुतांश उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, ब्रेक न लागल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर अनेक जण बसमध्ये अडकले, मात्र पोलिस-प्रशासनाच्या तत्परतेमुळे त्यांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात अनेकांचे हात पाय कापले गेले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिसऱ्या वाहनाची माहिती अद्याप समोर आलेली नाही. बस-ट्रक घटनास्थळी आहे, मात्र तिसरे वाहन फरार आहे.