मीना : सौदी अरबमधील हज यात्रेदरम्यान गुरुवारी झालेल्या चेंगराचेंगरीत १४ भारतीय भाविकांचा मृत्यू झाला असून, जखमींमध्ये १३ भारतीयांचा समावेश आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या ७१९वर पोहोचली आहे.भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे, जेद्दामधील भारतीय वाणिज्य दूतांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत १४ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर १३ जण जखमी झाले आहेत. मीना येथील दुर्घटनेतील जखमींची संख्या ८६३वर पोहोचली आहे. हज यात्रेसाठी जगभरातून १८० देशांतील २० लाख भाविक येथे दाखल झालेले असताना गुरुवारी चेंगराचेंगरी झाली. भारतातील दीड लाख भाविक हज यात्रेसाठी येथे दाखल झाले आहेत. या दुर्घटनेत इराणचे १३१ भाविक मृत्युमुखी पडल्याच्या वृत्ताला इराणने दुजोरा दिला आहे. पाकिस्तानचे ६ भाविकही मृत्युमुखी पडले आहेत.चौकशीचे आदेशसौदीचे शाह सलमान यांनी टीव्हीवरील एका संदेशात या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. या प्रकरणी लवकरात लवकर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने चौकशीसाठी एका समितीची स्थापना केली आहे.जमारातकडे जाणारे दोन रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या जागी ही चेंगराचेंगरी झाली. पवित्र मक्का शहरापासून हे स्थान ५ कि.मी. अंतरावर आहे. विरुद्ध दिशेने आलेले भाविक समोरासमोर आले आणि ही चेंगराचेंगरी झाली. जमारात ब्रिजच्या पाच मजली इमारतीजवळ ही दुर्घटना घडली. सैतानाला दगड मारण्याची येथे प्रथा आहे. यासाठीच मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते.
हज यात्रा चेंगराचेंगरीत १४ भारतीयांचा मृत्यू
By admin | Published: September 26, 2015 3:28 AM