कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये आज धक्कादायक घटना समोर आली आहे. हरिदेवपूरमधील एका भूखंडावर 14 अर्भकांचे सांगाडे सापडल्याने खळबळ माजली आहे. कोलकाता पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
वृत्तानुसार या रिकाम्या भूखंडावर साफसफाई सुरु होती. यावेळी कामगारांना अर्भकांचे सांगाडे आढळून आले. या घटनेबाबत तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात सांगाडे सापडल्याने राज्यात टोळी कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
अर्भकांचे सांगाडे एका प्लॅस्टिक बॅगमध्ये मिळाले आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच नजीकच्या नर्सिंग होममध्ये चौकशी केली जात आहे. याचवर्षी जानेवारीमध्ये कर्नाटकच्या विजयनगरमध्ये अशीच घटना समोर आली होतीय यावेळी 12 मुलांची मुंडकी सापडल्याने खळबळ माजली होती.