उज्जैन - कोरोनाचं संकट असतानाच देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. मध्यप्रदेशच्या उज्जैन (Ujjain) मध्ये एक अत्यंत भयंकर घटना समोर आली आहे. विषारी दारुमुळे (Poisonous Liquor) 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एक खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अवैध दारूविरोधात कारवाईत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच या घटनेनंतर खारा भागातील पोलीस ठाण्याच्या प्रभारींसह 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैनमध्ये दोन व्यक्तींचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी याचा तपास सुरू केला. त्यावेळी अन्य दोन व्यक्तींचा देखील अशाच प्रकारे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. अधिक चौकशी केली असता. विषारी दारूमुळे लोकांचा मृत्यू झाल्याचं समजलं आहे. सर्व मृतांच्या शरीरात विषारी घटक सापडल्याची माहिती आता समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले एसआयटीला चौकशीचे आदेश
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान या प्रकरणी एसआयटीला चौकशीचे आदेश दिले आहेत. फक्त उज्जैन नाही तर संपूर्ण राज्यात अशा स्वरुपातील प्रकरणांवर लक्ष ठेवलं जाईल. जेथे कोठेही विषारी दारू तयार केली जात असल्याचा संशय येईल, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे.
विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जण बेकायदेशीरपणे जिंजर (विषारी दारू) तयार करून विक्री करीत होते. मुख्यत: जिंजर तयार करणाऱ्यामध्ये सिंकदर, गबरू आणि युनूस यांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने तब्बल 86 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.
पंजाबमध्ये विषारी दारूमुळे 86 जणांचा मृत्यू; 25 जणांना अटक
पंजाबच्या तीन जिल्ह्यांत विषारी दारू पिऊन दगावलेल्या लोकांची संख्या आता 86 च्या वर गेली होती. तसेच याप्रकरणी 25 जणांना अटक करण्यात आली होती. तर 13 अधिकाऱ्यांसह दोन पोलिस ठाण्यांचे प्रभारी आणि एका डीएसपीला निलंबित करण्यात आले होते. 100 पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारीही करण्यात आली होती. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तातडीने चौकशीचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबास दोन लाख रुपयांच्या मदतीची ही घोषणा केली होती.