संविधान दिनाच्या कार्यक्रमावर 14 विरोधी पक्षांचा बहिष्कार, भाजपने साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 11:07 AM2021-11-26T11:07:09+5:302021-11-26T11:07:58+5:30
आज संविधान दिनानिमित्त केंद्र सरकारने संसद भवनात एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पण, त्यावर काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमुक, टीएमसीसह 14 पक्षांनी बहिष्कार टाकला आहे.
नवी दिल्ली: आज संविधान दिन आहे. आजच्या दिनानिमित्त केंद्र सरकारने संसद भवनात एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पण, या कार्यक्रमात काँग्रेस, समाजवादी पक्ष, द्रमुक आणि टीएमसीसह 14 पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे हिवाळी आधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष आणि सरकारमधील तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
केंद्रीय मंत्र्यांची काँग्रेसवर जोरदार टीका
विरोधी पक्षांनी टाकलेल्या बहिष्कारानंतर केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल म्हणाले की, आजचा दिवस महत्त्वाचा असून पन्नास वर्षांहून अधिक काळ देशावर राज्य करणारा काँग्रेससारखा पक्ष संविधान दिनावर बहिष्कार टाकत आहे. सभापतींनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणे म्हणजे बाबासाहेबांचा अपमान करणे आहे.
हा बहिष्टाकार टाकून काँग्रेसने सिद्ध केले की, ते फक्त त्यांच्या कुटुंबाशी संबंधित व्यक्तीचा सन्मान साजरा करतात आणि बाबासाहेब आणि सरदार पटेल यांच्यासारख्या महापुरुषांच्या सन्मानाशी त्यांना काहीच देणे-घेणे नाही. आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहोत मात्र या दिवसावर बहिष्कार टाकणे हा संविधानाचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी केली.
Best wishes to our citizens on Constitution Day.
— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2021
On this special day, sharing a part of Dr. Ambedkar’s speech
in the Constituent Assembly on 4th November 1948 in which he moved a motion for adoption of the Draft Constitution as settled by the Drafting Committee. pic.twitter.com/pviZNrKsGd
पंतप्रधान मोदींनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, 'आमच्या देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा. या विशेष दिवशी मी 4 नोव्हेंबर 1948 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच्या संविधान सभेतील भाषणाचा एक उतारा शेअर करत आहे, ज्यात त्यांनी मसुदा समितीने ठरवल्याप्रमाणे संविधानाचा मसुदा स्वीकारण्याचा ठराव मांडला होता.