नवी दिल्ली : देशातील बहुतांश भागातून मान्सून परतला असताना यंदा सरासरीपेक्षा तब्बल १४ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. २००९ नंतर मान्सूनमध्ये झालेला हा सर्वात कमी पाऊस आहे. मध्यप्रदेश व महाराष्ट्रात तर पावसाची तब्बल ३३ टक्के एवढी तूट नोंदली गेली आहे. परतीच्या पावसानेही यंदा दगा दिला आहे. गेल्या दशकात २००२ व २००९ मध्ये देशात अपुरा पाऊस पडल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्यात अनुक्रमे १९.२% व २१.८% तूट होती.विशेष म्हणजे २००९ मध्ये एकीकडे जागतिक मंदीचे संकट असताना दुसरीकडे मान्सूनने सुद्धा भारताला दगा दिला होता. तर १९७९ मध्ये १९% कमी पाऊस झाला होता. १९७९ नंतरचे हे सर्वात कमी चौथ्या क्रमांकाचे पर्जन्यमान आहे. २००२ मध्येही देशात पावसाने मोठी ओढ दिली होती. यंदा देशात ८८७.५ मिमी सर्वसाधारण पर्जनाच्या तुलनेत जून ते सप्टेंबरमध्ये ७६० मिमी पाऊस झाला. २०१४ मध्ये देशात ७८१.७ मिमी पाऊस झाला होता.आभाळाकडे डोळे लागलेल्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच देशाच्या उत्तर पश्चिम (वायव्य) भागात सप्टेंबरमध्ये पाऊस होऊनही देशातील या महिन्यामधील एकूण पर्जन्यमान २००५ नंतर सर्वात कमी होते. सप्टेंबरमध्ये भारतात सर्वसाधारणपेक्षा २४% कमी म्हणजे १३१.४ मिमी पाऊस झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क) दुष्काळ नाही !भारतीय हवामान शास्त्र विभाग मात्र देशातील पावसाच्या या स्थितीस दुष्काळ मानण्यास तयार नाही. कारण संपूर्ण देशात पाण्याची एकसारखी स्थिती नसते. एल निनोचा प्रभाव यंदाच्या कमी पावसास कारणीभूत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कमी पावसाचे प्रदेशउत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी ओढ दिली.
देशात पावसाची १४ टक्के तूट; परतीच्या पावसानेही दिला दगा
By admin | Published: October 20, 2015 3:41 AM