सूरत - दान हा सर्वश्रेष्ठ धर्म मानला जातो. जगामध्ये असे अनेक लोक आहेत. जे स्वत:च्या आयुष्यातील दु:खावर पांघरूण घालत गरजूंना दान देऊन त्यांच्या जीवनात आनंद पसरवत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. सूरतमधील एका १४ वर्षीय ब्रेनडेड मुलाने आपल्या शरीरातील अवयव दान करून सहा जणांना नवे जीवन दिले आहे. त्याच्या अवयवांचे दान त्याच्या आई वडिलांनी केले आहे.
या १४ वर्षीय मुलाचे नाव धार्मिक काकडीया आहे. तो सूरत शहरातील रहिवासा आहे. २७ ऑक्टोबर रोजी त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्याचे आईवडील त्याला उपचारांसाठी सूरतमधील किरण रुग्णालयात घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला ब्रेनडेड घोषित केले. धार्मिक ब्रेनडेड झाल्याची माहिती मिळताच शहरातील डोनेट लाईफ संस्थेला समजल्यावर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी मुलाच्या आई-वडिलांना अवयव दानाचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्यांना अवयवदानासाठी प्रोत्साहित केले.
त्यानंतर या मुलाच्या आई-वडिलांनी ब्रेनडेड झालेल्या मुलाचे अवयव दान करण्यास परवानगी दिली. त्यानंतर धार्मिकचे डोळे, हृदय, यकृत आणि दोन्ही हात सहा जणांना दान करण्यात आले. त्यामुळे त्यांना नवे जीवन मिळाले. अवयवदान केल्यानंतर हे अवयव चेन्नई, अहमदाबाद आणि मुंबईत पोहोचवण्यात आले. त्यासाठी तीन वेगवेगळे ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले. धार्मिकचे दोन हात पुण्यातील एका व्यक्तीला दान करण्यात आले. तर त्याचे हृदय जुनागडमधील एका १५ वर्षीय मुलाला दान करण्यात आले. त्याच्यावर अहमदाबादमध्ये शस्त्रक्रिया झाली. तर फुप्फुस आंध्रप्रदेशमधील एका व्यक्तीला दान केले गेले. त्याच्यावर चेन्नईमध्ये शस्त्रक्रिया झाली. तर धार्मिकचे यकृत गुजरातमधील पाटण येथील एका व्यक्तीला दान करण्यात आले. तर धार्मिकचे डोळे किरण रुग्णालयातच एका गरजूला देण्यात आले.
धार्मिक काकडिया याला पाच वर्षांपासून किडणीचा आजार होता. त्याचे वडील अजय भाई काकडिया हे एका हिऱ्यांच्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणूक काम करतात. धार्मिकचे वडील स्वत:ची किडनी मुलाला देण्यास तयार झाले होते. मात्र २७ तारखेला त्याची प्रकृती अधिकच बिघडली.