बैतूल : स्वत:च्या मृत्यूची भविष्यवाणी करणाऱ्या ज्योतिषाचार्याचा तब्बल 14 वर्षांनी मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशच्या बैतूलपासून 12 किमी लांब असलेल्या सेहरा गावातील कुंजीलाल यांनी 20 ऑक्टोबर 2005 मध्ये मृत्यूची भविष्यवाणी केली होती. विशेष म्हणजे हा दिवस करवाचौथचा दिवस होता.
कुंजीलाल यांच्या भविष्यवाणीमुळे त्यावेळी देशभरातील न्यूज चॅनेलनी पूर्ण दिवसभर या बातमीचे प्रसारण केले होते. कुंजीलाल त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना ग्रह ताऱ्यांवरून भविष्य सांगायचे. एके दिवशी त्यांनी या लोकांसमोरच मृत्यूची भविष्यवाणी केली. बघता बघता या भविष्यवाणीची गावात चर्चा झाली आणि नंतर ती थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. यामुळे ही बातमी प्रसारमाध्यमांमधून देशातच नाही जगभरात पोहोचली.
जेव्हा मृत्यूचा दिवस उजाडला तेव्हा देशातील सर्व न्यूज चॅनलनी सलग 12 तास लाईव्ह प्रक्षेपण केले होते. कारण त्यांच्या भविष्यवाणीची सत्यता लोकांना समजावी. या दिवशी कुंजीलाल यांच्यासोबत कुटुंबिय आणि गावकरी हनुमानाच्या मंदिरात जमले होते. तेथे भजन किर्तन करत होते. मात्र, त्या दिवशी कुंजीलाल यांना काहीच झाले नाही. तेव्हा त्यांनी पत्नीने करवाचौथचे व्रत करून आयुष्य वाढीची मागणी केल्याने मृत्यू टळल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
पिपली लाईव्हशी जोडलेला संबंधनंतर कुंजीलाल यांनी पिपली लाईव्ह या मुव्हीवर दावा केला होता. या मुव्हीतील पात्र आणि कथा त्यांच्याच जिवनावर आधारित असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांनी निर्माता आणि निर्देशकांना नोटिसही पाठविली होती. मात्र, पुढे काही होऊ शकले नाही. पिपली हे गाव त्यांच्या गावाच्या शेजारीच होते आणि त्यातील पात्र नत्थानेही मृत्यूची भविष्यवाणी केली होती.