अनेक युवक-युवती पोलीस दलात भरती होण्यासाठी जीवाचं रान करत असतात. स्पर्धा परीक्षा, शारीरिक व्यायाम याची पूर्वतयारी इच्छुक करतात. अलीकडेच उत्तर प्रदेश पोलीस भरतीचा निकाल जाहीर झाला. या निकालानंतर मेरठमधील एक गाव राज्यात चर्चेत आलं आहे. मेरठच्या सरूरपूर गावातील १४ जण एकाचवेळी पोलीस बनले आहेत. या १४ जणांमध्ये ३ मुली आणि ११ मुलांचा समावेश आहे. पोलीस शिपाई पदासाठी या १४ जणांची निवड झाली आहे. या गावची लोकसंख्या ८ हजाराच्या आसपास असून या १४ जणांच्या पोलीस निवडीनं गावात आनंदाचं वातावरण आहे.
पोलीस दलात भरती झालेल्या १४ उमेदवारांमध्ये प्रीती सूर्यवंशी, टीना, आंचल, अनुज कुमार, सनी, अजय कुमार, रोबिन, विशांत, सागर, अरविंद, निशांत पूनिया, रितिक, नईम आणि प्रदीप या तरूणांचा समावेश आहे. पोलीस शिपाईपदी या १४ जणांची एकाचवेळी निवड झाली आहे. पोलीस भरतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गावात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. पोलीस भरतीत पात्र ठरलेल्या या उमेदवारांपैकी काहींनी शिक्षणासाठी खूप संघर्ष केला आहे. पोलीस भरतीत निवड झालेल्या महिला उमेदवारांमध्ये कुणाचे आई वडील अशिक्षित आहेत तर कुणाचे वडील मजुरी करतात.
टीना पूनियाचे आणखी २ भाऊ आहेत त्यातील मोठा भाऊ लष्करात तर छोटा भाऊ पोलीस भरतीची तयारी करत आहे. टीनाच्या आई वडिलांनी शिक्षण घेतले नाही. ते शेती करतात. परंतु आपल्या मुलांनी शिक्षण घेऊन मोठं व्हावे, चांगली नोकरी करावी असं त्यांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न मुलीच्या पोलीस भरतीने पूर्ण झाले आहे. टीनाने याआधी ६ वेळा पोलीस भरतीत प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळा तिच्या पदरी निराशा आली मात्र तिने हार न मानता सातत्याने मेहनत सुरूच ठेवली. तिच्या आई वडिलांनीही तिला साथ दिली. अखेर तिचं पोलीस वर्दी घालण्याचं स्वप्न पूर्ण झाले.
दरम्यान, पोलीस शिपाई म्हणून निवड झालेल्या आंचलचे वडील मजुरी करतात. आंचलला चार बहिण आणि एक भाऊ आहे. ती ५ भावंडामध्ये सगळ्यात मोठी आहे. तिच्या वडिलांनी मजुरी करून तिला शिकवले. माझ्या मुलीला शिकवून तिला मोठं करावे हे माझं स्वप्न होते, मुलीनेही ते पूर्ण केले असं मजुरी करणाऱ्या आंचलच्या वडिलांनी सांगितले. तर गावातील २ सख्खे भाऊ एकाचवेळी पोलीस झालेत. या दोघांचे वडील पॉपकॉर्न विक्री करतात. आई कपडे शिलाई करते. इतरांच्या घरी काम करणाऱ्या आई वडिलांचा संघर्षातून दोन्ही मुले मोठी झाली आणि आज ते दोघेही पोलीस बनले आहेत.