मुंबई : केंद्र सरकारने विविध राज्यांना एकाचवेळी तब्बल ८६ हजार ९१२ कोटी जीएसटीच्या (वस्तू व सेवाकर) भरपाईपोटी दिले. महाराष्ट्राला १४ हजार १४५ कोटी रुपये मिळाले. केंद्राने जीएसटीचा पैसा अडविल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने होत असताना मंगळवारी केंद्राने महाराष्ट्राला मोठा दिलासा दिला. राज्यांना ३१ मे २०२२ पर्यंत देय असलेली जीएसटीची भरपाईची संपूर्ण रक्कम या निमित्ताने दिल्याचे केंद्राच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
तथापि, महाराष्ट्राला भरपाईची पूर्ण रक्कम मिळाली नसल्याचे राज्याच्या वित्त विभागाने स्पष्ट केले आहे. जीएसटी भरपाई निधीत २५ हजार कोटी होते. केंद्राने स्वत:च्या निधीतून ८६,९१२ कोटी दिले. सर्वाधिक रक्कम ही महाराष्ट्राला दिली. महाराष्ट्राखालोखाल तामिळनाडू - ९,६०२ कोटी रुपये. उत्तर प्रदेश ८,८७४ कोटी रुपये, कर्नाटक ८,६३३ कोटी रु., दिल्ली ८,०१८ कोटी रु., पश्चिम बंगाल ६,५९१ कोटी रुपये, असा निधी देण्यात आला आहे.
महाराष्ट्राला केंद्राकडून जीएसटीपोटी एकूण २९ हजार ६०० कोटी रुपये घ्यायचे आहेत. त्यातील १४ हजार १४५ कोटी रुपये मंगळवारी वितरित करण्यात आले. ही महाराष्ट्राला आतापर्यंत एका हप्त्यात मिळालेली सर्वांत मोठी रक्कम आहे. - मनोज सौनिक अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त)