तिरुवनंतपुरम : केरळमध्ये प्रचंड पावसाच्या तडाख्याने १४.५० लाख लोक विस्थापित झाले असून ते सध्या ३,८७९ निवारा शिबिरांमध्ये राहात आहेत. पुरात अडकलेल्यांची सुटका करण्याचे मदतकार्य आता जवळजवळ आटोपते घेण्यात आले असून सार्वजनिक ठिकाणी तसेच घराघरांत जो प्रचंड कचरा वाहून आला आहे त्याची सफाई करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे आजवर २३१ जणांचे बळी गेले असून अद्याप ३१ जण बेपत्ता आहेत. राज्यात सर्वात जास्त विस्थापित एर्नाकुलम जिल्ह्यात असून तेथील ८९० निवारा शिबिरांमध्ये ५.३२ लाख लोक राहात आहेत.पुरामुळे प्रचंड कचरा, गाळ घराघरांत साचला आहे. तीन हजार पथकांच्या मदतीने त्यांची सफाई सुरु केली आहे. या घाणीमुळे रोगराई पसरण्याचा धोका टाळण्यासाठी १२ हजार घरांची सफाई केली आहे व तीन हजार गुराढोरांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली आहे.विदेशी मदत स्वीकारणार नाहीनवी दिल्ली : केरळच्या पूरग्रस्तांसाठी संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) ७०० कोटी व मालदीवने ३५ लाखांंचे सहाय्य देण्याचे जाहीर केले असले तरी कोणतीही विदेशी मदत स्वीकारण्यास केंद्र सरकार राजी नाही. सुनामीच्या संकटानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपत्तीग्रस्तांसाठी विदेशी मदत न स्वीकारण्याचा निर्णय डिसेंबर २००४मध्ये घेतला होता. त्याच धोरणाची अंमलबजावणी केरळबाबत करण्यात येत आहे.केरळमधील जलप्रलयामागच्या कारणांचा ‘नासा’ने केला उलगडा; व्हिडिओ केला जारीवॉशिंग्टन : केरळमधील भयंकर जलप्रलयामागील कारणांचा उलगडा करणारा व्हिडिओ ‘नासा’ने जारी केला आहे. उपग्रहामार्फत प्राप्त माहितीचा वापर करून नासाने हा व्हिडिओ तयार केला आहे. यातून जोरदार पावसामुळे केरळ, कर्नाटकसह भारतातील अन्य भागांतील भयावह पूरस्थिती स्पष्ट होते. सर्वसामान्यपणे या काळात भारतात ग्रीष्मकालीन मॉन्सून होत असतो. तथापि, सामान्य मॉन्सूनदरम्यान वेळोवेळी हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. परिणामी, जोरदार पाऊस होऊ शकतो. शतकातील सर्वांत विध्वंसकारी जलप्रलयाशी केरळ झुंजत आहे. जोरदार पाऊस आणि पुराच्या तडाख्याने केरळमध्ये २३१ लोकांचा मृत्यू झाला.
केरळमध्ये १४.५० लाख लोक विस्थापित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 3:41 AM