नवी दिल्ली- गेल्यावर्षी देशातील विविध एअरपोर्टवरून तब्बल 1445.099 किलो सोनं जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसंच 2017 या वर्षात 536.37 किलो चांदी व 16.61 कोटी रूपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडून यासंदर्भातील माहिती जाहीर करण्यात आली. सीआयएसएफच्या माहितीनुसार, 2017मध्ये सोन्या व्यतिरिक्त एकुण 536.37 किलो चांदी आणि 16.61 कोटी रूपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेतून भारतात गैरमार्गाने आणलं जाणारं 23 किलो सोनं जप्त करण्यात आलं. शुक्रवारी जारी केलेल्या एका अधिकृत माहितीत डीआरआयने म्हंटलं की, याप्रकरणी चार लोकांना अटक करण्यात आली आहे. हे चौघे जण रामेश्वरम-चेन्नई सेतू एक्स्प्रेसने एमगोर स्टेशनवर उतरले त्यावेळी डीआरआयने त्यांना अटक केली. त्यांच्याकडून 23.1किलो वजनाचे गोल्ड बार जप्त करण्यात आले. बाजारात त्याची किंमत एकुण 7 करोड रूपये आहे.
एका दुसऱ्या प्रकरणात डीआरआयला तिरूचिरापल्ली एअरपोर्टवरून देशात होणाऱ्या स्मगलिंगची माहिती मिळाली होती. त्यांनी 11 किलो सोनंही जप्त केलं होतं. चालू आर्थिक वर्ष 2017-2018मध्ये डीआरआय चेन्नईने 31 विविध घटनांमध्ये 57 करोड रूपये मुल्य असणारं 193 किलो सोनं जप्त केलं, तसंच 57 लोकांना अटक केली. जप्त केलेलं 103 किलो तामिळनाडूच्या किनारी भागामार्फत श्रीलंकेतून भारतात आणलं जात होतं.