आज देश ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. पंतप्रधान मोदींनी दहाव्यांदा लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले. यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले. देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे हे दहावे संबोधन आहे. आपल्या भाषणात पीएम मोदींनी मणिपूर तसेच अन्य मुद्द्यांचाही उल्लेख केला.
"भारताच्या सामर्थ्याने जग थक्क झाले...": स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला पुढील पाच वर्षाची गॅरंटी दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले, मी तुम्हाला खात्री देतो, येत्या ५ वर्षांत देश पहिल्या तीन जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये आपले स्थान घेईल, ते नक्कीच होईल, असा विश्वासही पीएम मोदींनी यावेळी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी तिरंग्याच्या साक्षीने लाल किल्ल्यावरून देशवासियांना १० वर्षांचा लेखाजोखा देत आहे. १० वर्षांपूर्वी भारत सरकारपेक्षा राज्यांना ३० लाख कोटी अधिक दिले जात होते, गेल्या ९ वर्षांत हा आकडा १०० लाख कोटींवर पोहोचला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी पूर्वी भारत सरकारकडून ७० हजार कोटी रुपये जात होते, आज ते ३ लाख कोटींहून अधिक आहे. गरिबांच्या घरासाठी यापूर्वी ९० हजार कोटी रुपये खर्च केले जात होते, आज ४ लाख कोटी रुपये खर्च होत आहेत. भारत सरकार शेतकऱ्यांना युरियासाठी १० लाख कोटी रुपयांचे अनुदान देत आहे.
'आज भारत ग्लोबल साउथचा आवाज बनत आहे. जागतिक अर्थव्यवस्था आणि जागतिक पुरवठा साखळीत भारताचा वाटा वाढला आहे. भारताने आज जे काही कमावले आहे त्यामुळे जगात स्थिरतेची हमी मिळाली आहे. विश्वास पूर्ण झाला. आता चेंडू आपल्या कोर्टात आहे. आपण संधी सोडू नये, असंही मोदी म्हणाले.