कोलकाता : पश्चिम बंगाल भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरूच आहे. भाजप नेत्यांचे एकामागून एक राजीनामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: राज्याची कमान हाती घेतली आहे. दरम्यान, अमित शाह येत्या 4 मे रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत, परंतु त्यापूर्वी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बारासातमधील किमान 15 भाजप नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मात्र, बारासात जिल्हाध्यक्ष तापस मित्रा यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
या नेत्यांनी राजीनामे का दिला हे मला माहीत नाही. सर्व राजीनामे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. तसेच, सुकांता मजुमदार यांनीही यावर भाष्य करण्यास नकार दिला. राजीनामे दिलेल्यांमध्ये प्रदेश समिती सदस्य, माजी मंडळ अध्यक्ष आणि अगदी जिल्हा समिती सदस्यांचा समावेश आहे. राजीनामा देण्यापूर्वी सर्वांनी जिल्हाध्यक्ष तापस मित्रा यांच्यावर महापालिका निवडणुकीत तिकिटाच्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोप केला. महापालिका निवडणुकीत जिल्हा शाखेने आपल्या पसंतीच्या लोकांना तिकीट दिल्याचे राजीनामे दिलेल्या नेत्यांचे म्हणणे आहे.
विधानसभा निवडणुकीनंतरही राजीनामे सुरूच पश्चिम बंगालमध्ये 2021 च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीच्या दणदणीत विजयानंतर भाजपमध्ये राजीनामे सुरू आहेत. एकापाठोपाठ एक अनेक नेत्यांनी भाजपचे राजीनामे दिले आहेत. त्यात अनेक मोठ्या नावांचाही समावेश आहे. गेल्या काही महिन्यांत राज्यातील भाजपच्या एकूण आमदारांची संख्या 77 वरून 70 वर आली आहे. त्याचवेळी महापालिका निवडणुकीनंतर पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे अनेक कार्यकर्ते प्रदेश नेतृत्वावर खूश नाहीत.