नवी दिल्ली: कोरोना संकटाची तीव्रता कमी झाली असं वाटत असताना ओमायक्रॉननं धडक दिली. आतापर्यंत जवळपास ३० हून अधिक देशांमध्ये नव्या व्हेरिएंटनं शिरकाव केला आहे. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. कॅनडामध्ये नव्या व्हेरिएंटचे १५ रुग्ण आढळून आले आहे. देशात पुन्हा कोरोनाचा फैलाव होईल, अशी भीती आरोग्य अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
कॅनडामध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीयांची संख्या मोठी आहे. तिथून भारतात येणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. आफ्रिका खंडात ओमायक्रॉन पहिल्यांदा आढळून आला. त्यामुळे आफ्रिकन देशांचा समावेश धोकादायक देशांच्या यादीत करण्यात आला. मात्र आता कॅनडामध्येही ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढल्यानं धोका वाढला आहे.
हैदराबादच्या आरजीआय विमानतळावर एका दिवसात ७ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सगळ्यांना टीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परदेशांमधून आलेले १२ जण आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये ब्रिटनहून आलेल्या ९ जणांचा, तर सिंगापूर, कॅनडा आणि अमेरिकेहून आलेल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यांचे नमुने जिनॉम सिक्वन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.
आफ्रिकेत ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं नव्या व्हेरिएंटविरुद्धच्या लढ्यासाठी आफ्रिकेतील देशांना १२ मिलियन अमेरिकन डॉलरचा आपत्कालीन निधी जाहीर केला आहे. पुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी हा निधी देण्यात आला आहे. डब्ल्यूएचओचे आफ्रिका विभागाचे आपत्कालीन संचालक अब्दुल सलाम गुए यांनी याबद्दलची घोषणा केली.