श्रीनगर: पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात रविवारी तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये एका अवघ्या १५ दिवसांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. जम्मू काश्मीरच्या पूँछमधील नियंत्रण रेषेलगत असणाऱ्या गावांना काल गोळीबाराचा फटका बसला. विशेष म्हणजे पाकिस्तानी सैन्यानं गोळीबारासोबतच उखळी तोफांचादेखील वापर केला. पाकिस्तानी लष्करानं केलेल्या गोळीबारात मोहम्मद आरीफ (४०), फातिमा जान (३५) आणि फातिमा यांचा १५ दिवसांचा चिमुकला जखमी झाला. शाहपूर सेक्टरमध्ये ही घटना घडली. जोरदार गोळीबार सुरू असतानाही जखमी झालेल्या तिघांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शाहपूर सेक्टरसोबतच सौजियान आणि मेंढर सेक्टरमध्येही पाकिस्तानकडून तुफान गोळीबार करण्यात आला. यामुळे काही घरांचं नुकसानदेखील झालं. पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. 'पाकिस्ताननं संध्याकाळी ५ वाजता शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. यावेळी पाकिस्तानकडून उखळी तोफांचा वापरदेखील करण्यात आला,' अशी माहिती जम्मू-काश्मीरमधील लष्कराचे जनसंपर्क अधिकारी असलेल्या देवेंदर आनंद यांनी दिली. याआधी २२ जुलैला पाकिस्तानच्या गोळीबारात एका भारतीय जवानाला वीरमरण आलं. तर २० जुलैला पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.
नापाक! पाकिस्तानच्या गोळीबारात १५ दिवसांच्या चिमुकल्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 4:45 PM