नवी दिल्ली - डेंग्यूच्या उपचारासाठी दाखल सात वर्षाच्या मुलीच्या पालकांच्या हातात रुग्णालयाकडून तब्बल 16 लाखांचं बिल सोपवण्यात आलं आहे. गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयाने 15 दिवसांसाठी 16 लाखांच बिल दिलं आहे. मात्र इतकं करुनही मुलगी मात्र वाचू शकली नाही. मुलीला फोर्टिस रुग्णालयातून रॉकलॅण्ड रुग्णालयात शिफ्ट केलं जात असताना तिचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.
फोर्टिस रुग्णालयाने मात्र आपण कोणतीही हयगय केली नसल्याचा दावा केला आहे. आद्या सिंगवर उपचार करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात आले असून, सर्व मेडिकल प्रोटोकॉल पाळण्यात आल्याचं रुग्णालयाचं म्हणणं आहे. रुग्णालयाने आरोग्यमंत्र्यांकडे सविस्तर स्पष्टीकरण दिलं असून, रुग्णाच्या पालकांना 15.79 लाखाचं बिल देण्यात आल्याचं सांगितलं आहे.
मुलीच्या वडिलांच्या एका मित्राने ही घटना 17 नोव्हेंबरला ट्विटरला शेअर करत संताप व्यक्त केला होता. 'माझ्या एका मित्राच्या सात वर्षाच्या मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. 15 दिवसांपासून ती फोर्टिस रुग्णालयात होती. 2700 ग्लोव्ह्जसोबत 18 लाखांचं बिल लावण्यात आलं आहे. पण अखेर तिचा मृत्यू झाला. लाचखोर *******', असं त्या मित्राने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. चार दिवसांत 9 हजार जणांनी हे ट्विट रिट्विट केलं. आरोग्यमंत्र्यांनीही या ट्विटची दखल घेत सविस्तर माहिती देण्याची मागणी केली होती.
मुलीच्या वडिलांनी रुग्णालयाने दुर्लक्ष करत चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला आहे. 'सरकारने अशा रुग्णालयांवर कारवाई करणं गरजेचं आहे, जेणेकरुन यापुढे दुस-या पेशंटसोबत ते असे वागणार नाहीत', असं जयंत सिंग बोलले आहेत. जयंत सिंग आयटी प्रोफेशनल आहेत. आपली मुलगी अदयाच्या उपचारासाठी त्यांनी पाच लाखांचं कर्जही काढलं होतं. याशिवाय आपल्या बचत खात्यातूनही त्यांनी पैसे काढले होते. नातेवाईकांच्या मदतीने त्यांनी पैसे उभे केले होते. पण जिच्यासाठी हा खटाटोप केला तिला मात्र वाचवू शकले नाही.
आद्या दुसरीत शिकत होती. 27 ऑगस्टला तिला खूप ताप आला होता. ताप कमी होत नसल्याने आई वडिल तिला घेऊन रॉकलॅण्ड रुग्णालयात गेले. त्यावेळी तिला डेंग्यू झाल्याचं निष्पन्न झालं. तिची प्रकृती खराब होत असल्या कारणाने डॉक्टरांनी तिला मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दला. यानंतर 31 ऑगस्टला तिला फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्लेटलेट कमी असल्याने तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले.
मुलीला 10 दिवस लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं, आणि यावेळी रुग्णालयाने आम्हाला भरमसाट बिल लावलं असा आरोप आई-वडिलांनी केला आहे. त्यांनी बिलात लावलेल्या गोष्टी वापरल्यात की नाही याबाबत आम्ही साशंक आहोत असा आरोप कुटुंबाने केला आहे.
'14 सप्टेंबरला एमआरआयमध्ये मेंदूला जखम झाल्याचं निष्पन्न झालं. डॉक्टरांनी यानंतर हात टेकले होते. यावेळी आम्ही तिला दुस-या रुग्णालयात शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला पण डॉक्टरांनी अॅम्ब्यूलन्स देण्यासही नकार दिला', असा आरोप कुटुंबाने केला आहे. दुस-या रुग्णालयात शिफ्ट करत असताना अंगावरील गाऊनसाठीही त्यांनी पैसे द्यायला लावल्याचा आरोप जयंत सिंग यांनी केला आहे. 14-15 सप्टेंबरच्या रात्री रॉकलॅण्ड रुग्णालयात नेलं असता तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.