द्वारका- जीएसटीमध्ये केलेल्या बदलामुळे देशात पंधरा दिवस आधीच दिवाळीचं वातावरण तयार झालं आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. जीएसटी लागू केल्यानंतर तीन महिन्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, जिथे कमतरता आढळेल तिथे सुधारणा करून त्या दूर केल्या जातील, असं मी आधीच म्हंटलं होतं. तीन महिन्यात जी माहिती समोर आली आहे त्या माहितीनुसार अर्थ मंत्र्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. त्या निर्णयांचं देशात सगळीकडून कौतुक केलं जातं असल्याचा आनंद आहे, असं मोदी म्हणाले आहेत. देशातील व्यावसायिकांना फाईल आणि सरकारी बाबूंची कटकट निर्माण होऊ नये, असं आम्हाला वाटत. त्यामुळेच ही नवी सिस्टीम लागू करण्यात याली आहे, असं त्यांनी सांगितलं. संपूर्ण देशाने सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केल्याचा दावाही मोदींनी केला आहे.
जीएसटीच्या ढिसाळ अंमलबजावणीमुळे नाराज झालेले व्यापारी, गरजेच्या वस्तू महागल्याने सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेला रोष आणि तोंडावर आलेली गुजरात निवडणूक लक्षात घेत अखेर केंद्र सरकारने जीएसटीचा बोजा कमी करून सर्वांना दिवाळी भेट दिली. जीएसटी कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी झाली. बैठकीनंतर कौन्सिलचे अध्यक्ष व अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रपरिषदेत नव्या दराची आणि सवलतींची घोषणा केली होती. यानिर्णयाचं मोदींनी द्वारकामध्ये कौतुक केलं आहे.
संपूर्ण देशाचा विकास करणं हे आमचं स्वप्न असून आम्ही तेच काम करतो आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे. सगळ्यांनी संकल्प करा आणि त्या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी जीव लावून काम करा. विकास व्हावा असं सगळ्यांनाच वाटतं आणि त्याचं फळ मिळावं अशीही सगळ्यांची इच्छा आहे. भविष्यातील पीढीला गरीबीमध्ये जीवन जगायला लागू नये, असंही मोदी म्हणाले. आज संपूर्ण दुनिया भारताकडे पाहते आहे, असंही मोदी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. शनिवारी सकाळी ओखा को बेटाला द्वारकाशी जोडणाऱ्या एका चार पदरी पुलाच्या प्रकल्पाचं उद्धाटन मोदींनी केलं. त्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
भुतकाळात भारत सरकारला गुजरातबद्दल किती प्रेम होतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यावेळी सुर्यास्ताच्या आधी लोक सगळी काम करून घरी परतायची, ही स्थिती मी डोळ्यांनी पाहत होतो, असंही मोदी म्हणाले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास यात्रेत सहकार्य करत असल्याबद्दल गुजरातच्या जनतेचे आभारही मानले. आज द्वारका नगरीमध्ये ज्या कार्यक्रमाची सुरूवात झाली आहे, तो पूल फक्त द्वारका बेटापर्यंत जाणार पूल नसून सांस्कृतिक कड्यांना जोडणारा हा पूर आहे, असंही मोदींनी म्हंटलं.
यावेळी द्वारकामध्ये मरीन पोलीस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट करणार असल्याचं मोदी म्हणाले आहेत. आपला संपूर्ण समुद्री तट ब्लू इकॉनॉमीच्या माध्यमातून पुढे जातो आहे. याचबरोबर मानव संसाधन विकासासाठी मला एक भेट द्यायची आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.
काही लोकांना जपान फक्त बुलेट ट्रेनवरून आठवतं पण जपानच्या मदतीने आम्ही अलंगच्या विकासाची योजना बनवत आहोत, असं म्हणत बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरून मोदींवर टीका विरोधकांना मोदींनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला. अलंगच्या विकासाने तेथिल लोकांच्या जिवनात मोठा बदल होणार असल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. मच्छीमारांचं आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी सरकार त्यांना कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देणार असून याचा फायदा मच्छीमारांना मोठी बोट घेण्यासाठी होणार आहे.