नवी दिल्ली : जेट एअरवेजने तुम्ही १५ जुलैपासून देशांतर्गत प्रवास करणार असाल, तुम्हाला तुमच्या बॅगमधील सामानावर नियंत्रण ठेवावे लागेल. सगळे सामान बॅगेत कोंबून चालणार नाही. जेट एअरवेजने बॅगची संख्या व वजनाबाबत नवे नियम लागू केले असून, आता १५ किलोपेक्षा अधिक सामान नेता येणार नाही.इकॉनॉमी क्लासचं तिकीट असलेल्या प्रवाशांना सोबत १५ किलो सामान असलेली एकच बॅग नि:शुल्क नेता येईल, असे जेट एअरवेजने स्पष्ट केले आहे. बिझनेस क्लासच्या प्रवाशांना १५ किलो वजनाच्या प्रत्येकी दोन बॅगांची मुभा असेल. तुम्ही जेटचे प्लॅटिनम कार्डधारकांनाही दोन बॅगा नेता येतील.तुमच्या बॅगमधील सामानाचे वजन १५ किलोपेक्षा अधिक असल्यास त्यावर किती अधिक शुल्क आकारले जाईल, हे जेटने स्पष्ट केलेले नाही. मात्र १४ जूनच्या आधी तिकीट काढलेल्या व १५ जुलैपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हे नियम लागू नसतील. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी बॅगेजच्या संख्येवर वर्षभरापूर्वीच बंधने घातली होती. परदेशामध्ये देशांतर्गत प्रवास करणा-यांना आधीपासून ही बंधने आहेत. >वेळेची होईल बचत, अधिक महसुलाचा प्रयत्न?प्रवाशांच्या बॅगची संख्या कमी झाल्यास चेकइनच्या वेळेला तसेच विमानातून उतरल्यावर बेल्टवरून सामान घेताना लागणारी वेळ कमी होईल. शिवाय अतिरिक्त बॅगा वा वजन असल्यास त्यावर भराव्या लागणा-या शुल्कामळे विमान कंपनीला अधिक महसूलही मिळू शकेल. जेट एअरवेजपाठोपाठ अन्य विमान कंपन्यांनीही असेच नियम लागू केल्यास आश्चर्य वाटू नये.
‘जेट’च्या विमानांत १५ किलो सामानाचे बंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 3:48 AM