बीरभूम - सोन्याचे दागिने परिधान करायला महिलांना आवडतात. मात्र एका महिल्याच्या पोटातून दीड किलो सोनं बाहेर काढण्यात आल्याचं कोणी सांगितलं तर सुरुवातीला कोणी विश्वासच ठेवणार नाही. पण हो हे खरं आहे. पश्चिम बंगालमधील बीरभूम या जिल्ह्यामधील एका सरकारी रुग्णालयात एका महिलेच्या पोटातून तब्बल दीड किलो सोने आणि नाणी बाहेर काढण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोटात दुखत असल्यामुळे एका महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेवर शस्त्रक्रिया केली असता तिच्या पोटातून दीड किलो वजनाचे दागिने आणि नाणी बाहेर काढण्यात आली आहेत. या महिलेची मानसिक स्थिती चांगली नसल्यामुळे ती दागिने व नाणी खात असल्याची माहिती समोर आली आहे. रामपूरहाट सरकारी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील सर्जरी विभागाचे प्रमुख सिद्धार्थ विश्वास यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 महिलेचं पोट दुखत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोटात दुखत असल्याने अल्ट्रासाउंड तपासणी केली. त्यामध्ये पोटात दागिने तसेच नाणी असल्याचे स्पष्ट झाले. महिलेवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटातून 5 व 10 रुपयांची नाणी तसेच चेन, सोन्याच्या बांगड्या, पैंजण, घड्याळ बाहेर काढण्यात आले आहे. मारग्राम या गावात ही महिला राहते. घरातील दागिने आणि काही वस्तू या सातत्याने गायब होत होत्या. मात्र महिलेकडे याबाबत चौकशी केली असता ती रडायची. तिचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. जेवल्यावर तिला उलट्या व्हायच्या अशी माहिती महिलेच्या आईने दिली आहे. काही दिवसांपासून महिला आजारी असल्याने तिला तपासणीसाठी नेले असता हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.
अहमदाबादच्या एका सरकारी रुग्णालयामध्ये काही महिन्यांपूर्वी एका महिलेच्या पोटातून लोखंडाच्या काही वस्तू बाहेर काढण्यात आल्या होत्या. संगीता असं या महिलेचं नाव असून पोट दुखीच्या तक्रारीसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर तिच्या पोटातून दीड किलोच्या वस्तू काढण्यात आल्या होत्या. संगीता महाराष्ट्रातील शिर्डीची रहिवाशी असून मानसिक रुग्ण होती. अहमदाबादच्या शाहरकोटडा परिसरात संगीता पोलिसांना फिरताना दिसली. कोर्टाच्या आदेशानंतर तिला मानसिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र पोटात दुखत असल्याने उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महिलेचे एक्सरे काढले. त्यामध्ये त्यांना काही धक्कादायक गोष्टी दिसून आल्या. त्यामुळे डॉक्टरांनी या महिलेवर तातडीनं शस्त्रक्रिया केली असता तिच्या पोटातील लोखंडाच्या वस्तू बाहेर काढल्या होत्या.