बेंगळुरू : कर्नाटक निवडणुकीत मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना आरोप- प्रत्यारोपाची राळ उठली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपची संपूर्ण टीम या निवडणुकीसाठी प्रचारात उतरली असून, दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधीही प्रचंड गर्दीच्या सभा घेत आहेत. भाजपने राष्ट्रीय मुद्दे, मुस्लीम आरक्षण हा मुद्दा मोठा केला असून, काँग्रेसने मात्र, स्थानिक प्रश्न, भ्रष्टाचार या मुद्यांना हात घातल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदीही प्रचारात उतरत असल्याने निवडणूक आणखी रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.
टी नरसीपुरा : कर्नाटकमधील भाजप सरकारवर प्रचंड भ्रष्टाचाराचा आरोप करीत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या सरकारने राज्याची दीड लाख कोटी रुपयांची लूट केल्याचा दावा मंगळवारी येथे केला. कर्नाटकात १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सत्तेवर येईल आणि राज्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देशात लोकशाही टिकून राहण्यासाठी केंद्रातील आणि कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाची (भाजप) सरकारे सत्तेतून बाहेर काढावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्या सरकारमधील भ्रष्टाचाराविरोधात मौन बाळगून आहेत आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) यासह सरकारी यंत्रणा विरोधकांच्या विरोधात वापरतात. - मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस
नंदिनी ब्रँडला बळकट करू‘अमूल’ विरुद्ध ‘नंदिनी’ या वादावर भाष्य करताना प्रियंका म्हणाल्या, काँग्रेस कर्नाटकचा ‘नंदिनी’ ब्रँड मजबूत करील आणि बाहेरून कोणतीही सहकारी संस्था येथे येणार नाही. यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस व कर्नाटकचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला, माजी मंत्री एच. सी. महादेवप्पा, आमदार यतिंद्र सिद्धरामय्या, आदी उपस्थित होते.