ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. 22 - भारतीय आयटी इंडस्ट्री 2017-18 या आर्थिक वर्षात जवळपास 1.5 लाख गरजूंना नोक-या उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती नासकॉमनं दिली आहे. यंदाच्या वर्षात भारतीय आयटी क्षेत्रातील निर्यात वाढीचा अंदाज 7 ते 8 टक्क्यांपर्यंत वर्तवण्यात आला आहे. तर देशांतर्गत बाजारात आयटी क्षेत्रात 10-11 टक्के वाढ होईल, असाही एक अंदाज आहे. त्यामुळे आयटी आणि बीपीएम इंडस्ट्रीमध्ये जवळपास 1.3 लाख ते 1.5 लाख रोजगाराची निर्मिती होणार आहे, अशी माहिती नासकॉमचे अध्यक्ष आर. चंद्रशेखर यांनी दिली आहे. मागील आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रात 1.7 लाख रोजगार उपलब्ध झाले होते. परदेशातल्या प्रमुख बाजारपेठांमधील राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेचा आयटी क्षेत्रावर प्रभाव पडत असतो. तसेच आयटी क्षेत्रात होत असलेल्या वारेमाप खर्चामुळेही क्षेत्र ब-याचदा प्रभावित होत असतं. आयटी क्षेत्र भविष्यात नक्कीच सकारात्मक बदल होतील, अशी आशाही नासकॉमनं व्यक्त केली आहे. भारतीय शेअर हे जागतिक आयटी क्षेत्रात केवळ स्थिर नाही, तर वाढतसुद्धा असल्याचं चंद्रशेखर यांनी सांगितलं आहे. भारतीय आयटी इंडस्ट्रीचा बाजार सद्यस्थितीत 154 अब्ज डॉलरच्या आसपास असून, त्यात मागील आर्थिक वर्षात 11 अब्ज डॉलरच्या स्वरूपात महसुलात वाढ नोंदवली गेली आहे, अशी माहिती नासकॉमनं दिली आहे.
भारतीय IT इंडस्ट्री देणार 1.5 लाख लोकांना नोक-या: नासकॉम
By admin | Published: June 22, 2017 4:49 PM