ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 25 - भारतीयांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले असून, देशातील तब्बल 15 कोटी प्रौढ नागरिक मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ आणि न्युरो सायन्स (निम्हान्स) ने राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण 2016 हा सर्वे केला होता. या सर्वेअंतर्गत तामिळनाडू, केरळ, गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल मणिपूर आणि आसाममधील 40 हजार प्रौढ आणि 1 हजार 200 किशोरवयीनांचे मानसिक आरोग्य तपासण्यात आले होते. या सर्वेमधून छत्तीसगड, पश्चिम बंगाल, मणिपूर आणि आसाम या राज्यांमधील नागरिकांमध्ये सर्वाधिक मानसिक समस्या आढळून आली आहे. तर कर्नाटकमध्ये एकूण लोकसंख्येच्य 8 टक्के नागरिक हे मानसिक आजारांनी त्रस्त असल्याचे समोर आले आहे. तसेच 13 ते 17 वयोगटातील सुमारे 7.3 टक्के मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे.
या सर्वेमधून दर दहापैकी एका व्यक्तीला नैराश्य, चिंता यांसारख्या मानसिक समस्या भेडसावत असून त्यातील नैराश्याने ग्रस्त असलेल्या लोकांचे प्रमाण अधिक असल्याची माहितीही समोर आली आहे. "शहरी भागांमध्ये मानसिक ताणतणावाच्या समस्येचे प्रमाण अधिक आहे. तसेच कनिष्ठ उत्पन्न गट आणि अल्पशिक्षित लोक मानसिक तणावाची शिकार होण्याचे प्रमाण अधिक असल्याचेही आढळून आले आहे," असे हा सर्वे करणाऱ्या निम्हासचे निर्देशक डॉ. बी. एन. गंगाधर यांनी सांगितले.