नवी दिल्ली : कोणतीही भाडेवाढ केली नसताना चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत रेल्वे प्रवाशांची संख्या १५ कोटींनी घसरल्याने रेल्वे मंत्रालय बुचकळ्यात पडले आहे. प्रवाशांची घटती संख्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची चिंता वाढवणारी ठरली आहे.रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी १५ सप्टेंबर रोजी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची बैठक बोलावत (जीएम) या मुद्द्यावर चर्चा केली असताना त्यांनाही आश्चर्य व्यक्त करण्यावाचून राहवले नाही. रेल्वेगाड्या नेहमीच हाऊसफुल्ल असतात. तुम्हाला आरक्षित तिकीट मिळत नाही. मग तुम्ही रेल्वेतील प्रवाशांची संख्या कमी झालीय, असे कसे म्हणता? संख्येबाबत काहीतरी घोटाळा आहे, असे ते या बैठकीत म्हणाल्याचे कळते.एप्रिल ते आॅगस्ट २०१५ या काळात रेल्वेतून ३५७.५ कोटी प्रवाशांनी प्रवास केला. चालू आर्थिक वर्षातील प्रवाशांची संख्या ३४२.५ कोटी आहे. प्रवाशांच्या संख्येत झालेली घट ४.२ टक्के आहे. हाच कल कायम राहिल्यास वर्षअखेर रेल्वे प्रवाशांची कपात ५ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. लागोपाठ दुसऱ्या वर्षी प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. २०१४-१५ या वर्षातही रेल्वेने १९.१ कोटी प्रवासी गमावले होते. दीर्घ पल्ल्याच्या एसी डब्यांमधील आरक्षित श्रेणीत ८० लाख प्रवाशांची संख्या वाढली, हीच काय ती जमेची बाजू म्हणता येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क) विभागीयमहाव्यवस्थापकांना पत्र रेल्वेप्रवाशांची संख्या घटल्याने चिंतेत पडलेले रेल्वे मंडळाचे अध्यक्ष (सीआरबी) ए.के. मित्तल यांनी सर्व विभागीय महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून त्या-त्या विभागातील प्रवाशांच्या कमी झालेल्या संख्येबाबत कारणे शोधण्यास सांगितले आहे. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत कमी असलेले दर हे त्यामागचे कारण असल्याचे रेल्वे मंडळाचे सदस्य मानतात. हे शोधण्यासाठी फार मोठे शोधकार्य करण्याची गरज नाही, असे सांगत अनेक अधिकाऱ्यांनी हे पत्र अनावश्यक मानले आहे. ही आहेत संभाव्य कारणे!-रेल्वे प्रवासी नाराज होण्याची अनेक कारणे आहेत. तिकीट बुक करण्यापासून त्याची सुरुवात होते, तर प्रवास पार पडेपर्यंत त्रासात भरच पडत जाते.-लांबच लांब रांगांमुळे तिकीट खरेदी करणेही अनेकांसाठी त्रासदायक.-कमी पल्ल्याच्या अंतरासाठी किंवा उपनगरी प्रवासासाठी रस्ते वाहतुकीला अधिक पसंती. कमी दरात प्रवास करण्याऐवजी कमी वेळेत प्रवासाला प्राधान्य.-दिल्लीसारख्या ठिकाणी तिकीट वेंडिंग मशीन बसविण्यात आल्या; मात्र त्या उपयोगात नाहीत. नेमके पैसे टाकावे लागतात. पैसे परत मिळत नाहीत, अशा तक्रारीही आहेत.-मोबाइल बुकिंग अॅप्सचा वापर किती जण करतात हा प्रश्नच आहे. अनेक प्रवाशांकडे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नसते.-रेल्वेमध्ये ५ हजार ‘टीटीर्इं’ची कमतरता आहे. त्यामुळे फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली असावी.
रेल्वेने गमावले १५ कोटी प्रवासी
By admin | Published: September 19, 2015 10:49 PM