New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्लीरेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी आहेत. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत, नवी दिल्लीरेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे व्यथित झाल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले आहे, नवी दिल्ली रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे व्यथित आहे. माझ्या संवेदना अशा सर्वांसोबत आहेत, ज्यांनी आपले प्रियजन गमावले. जखमीनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो. या चेंगराचेंगरीतील बाधितांना अधिकारी मदत करत आहेत."
याच बरोबर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून वाईट बातमी. रेल्वे प्लॅटफॉर्मवर झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अत्यंत दुःखी आहे. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना, शोकाकूल कुटुंबीयांसोबत आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रर्थना करतो.
केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी डाक्टर आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असून त्यांना काही निर्देश दिले आहेत. दिल्लीतील मुख्य सचिवांनी वेगवेगळ्या रुग्णालयात मोठी वैद्यकीय टीम तैनात केली आहे.चौकशीसाठी रेल्वेकडून कमीटी तयार -यासंदर्भात बोलताना रेल्वे बोर्डाच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार म्हणाले, "आज सायंकाळच्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या नेहमीपेक्षा खूप अधिक होती. यामुळे रेल्वेने नियमित गाड्यांसह विशेष गाड्या चालवल्या. काही वेळासाठी प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली, यामुळे काही लोक बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या परिस्थिती सामान्य आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि आरपीएफ डीजी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.