नवी दिल्ली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरी भागांमध्ये ५४ लाख ९५ हजार घरे बांधण्याचे जे उद्दिष्ट राखण्यात आले आहे, त्यातील १५ टक्के घरे गेल्या तीन वर्षांत बांधून पूर्ण झाली, असा दावा केंद्रीय नागरी व्यवहार आणि गृहनिर्माण खात्याने केला आहे.या खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत २०१५ ते २०२२ या कालावधीत देशभरात १ कोटी घरे बांधण्याचे ठरविले आहे. त्या दिशेने वेगात काम सुरू आहे.या योजनेखाली गेल्या महिन्यात शहरी भागांमध्ये १ लाख १२ हजार घरे बांधण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे केंद्रातर्फे बांधकामासाठी आर्थिक मदत दिली जाणाऱ्या अशा घरांची संख्या ५४ लाख ९५ हजार ४४३ इतकी झाली आहे. नगर आणि गृहनिर्माण खात्याचे प्रवक्ते राजीव जैन म्हणाले की, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही घरे लवकरात लवकर बांधून कशी पूर्ण करता येतील, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.या योजनेत ४३२० शहरे, छोटी शहरे यांचा समावेश करण्यात आला असून यंदा जुलै अखेरपर्यंत ११,२२६ गृहनिर्माण प्रकल्प मंजूर करण्यात आले. ज्या नागरिकाचे देशातील कोणत्याही भागात स्वत:च्या नावावर पक्के घर नाही, अशा कोणालाही या योजनेत सहभागी होता येईल.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला तेव्हापासून ते यंदा २१ आॅगस्टपर्यंत शहरी भागात ८.५५ लाख घरे बांधून पूर्ण झाली आहेत. देशभरात ३०.४ लाख घरांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे या सरकारच्या दाव्यावर टीका काँग्रेसचे प्रवक्ते आर. पी. एन. सिंग यांनी टीका केली. ते म्हणाले की, या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत पूर्ण झालेले काम हे नगण्य आहे; पण त्याचेही भांडवल करणे हा भाजपचा नवीन जुमला आहे.