चेन्नई - तामिळनाडू आणि पदुच्चेरीला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. तामिळनाडूच्या कोईंबत्तूरमध्ये मुसळधार पावसामुळे घरावर भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत तामिळनाडू सरकारच्यावतीने करण्यात येणार आहे. हवामान खात्याने काही दिवस या भागात जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडू पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असून जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील नादूर कन्नपमध्ये सोमवारी (2 डिसेंबर) सकाळी भिंत कोसळून तीन घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला असून पावसामुळे ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत तामिळनाडू सरकारच्यावतीने करण्यात येणार आहे. जोरदार पावसामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालयं हे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सहा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
चेन्नईच्या हवामान विभागाने नागरिकांना सतर्क केले आहे. थिरुवल्लूर, वेल्लोर, थिरुवन्नामलाई, थुटीकुडी, रामनाथपूरम आणि तिरूनेलवेली या जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसामुळे येथील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. देशासह राज्यात ठिकठिकाणी मान्सूनचा तडाखा नागरिकांना बसला आहे. भारतात या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामध्ये 2391 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मान्सूनमध्ये झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 2391 जणांना जीव गमवावा लागला. यंदा जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच अनेक ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लोकसभेत मंगळवारी (19 नोव्हेंबर) याबाबत माहिती देण्यात आली.
केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मान्सूनमुळे देशातील 2391 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर आठ लाखांपेक्षाही अधिक घरांची हानी झाली असल्याची माहिती दिली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) 176 पथकांनी 98,962 नागरिकांची सुटका केली आणि देशातील 23,869 नागरिकांना वैद्यकीय मदत करण्यात आल्याची माहिती राय यांनी दिली. पाऊस, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे 15,729 जनावरे बेपत्ता झाली आणि 63,975 लाख हेक्टर जमिनीवरील पिकांना फटका बसला. तसेच अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असल्याची माहिती देण्यात आली.