तिरुवनंतपुरम : इस्लामिक स्टेटचे (आयएसआयएस) १५ संशयास्पद अतिरेकी लक्षद्वीपकडे निघाल्याच्या गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानंतर केरळच्या समुद्र तटावर उच्च दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.संशयित अतिरेकी नौकांमधून श्रीलंकेतून लक्षद्वीपकडे जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना समजली. पोलिसांच्या उच्च पदस्थ सूत्रांनी नमूद केले की, समुद्र किनाऱ्याजवळील पोलीस ठाणी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तटरक्षक दलाने लक्षद्वीप व मिनिकॉय द्वीपच्या जवळ तसेच श्रीलंका सीमेवर समुद्री जहाज आणि शोधक विमाने तैनात केली आहेत.अशा प्रकारचे उच्च दक्षतेचे आदेश सामान्य बाब आहे. मात्र या वेळी अतिरेक्यांच्या संख्येबाबत खास माहिती आहे. कोणतीही संशयास्पद नौका दिसल्यास तटीय पोलीस ठाणी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे या उच्च पदस्थांनी नमूद केले.तटीय पोलीस विभागाला सुध्दा श्रीलंकेमधून माहिती समजली. त्यामुळे २३ मे पासूनच दक्ष असल्याचे या विभागाचे म्हणणे आहे. श्रीलंका हल्ल्यानंतर आम्ही दक्ष आहोत. मच्छीमार नौकांच्या मालकांना आणि समुद्रात जाणाºया इतरांनाही कोणत्याही संशयास्पद हालचालीबद्दल सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशी साखळी बॉम्बस्फोट झाले. २५० पेक्षा अधिक लोक मरण पावले. त्यानंतर केरळ मध्ये अतिदक्षता असून राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासात आयएसआयएसचे अतिरेकी केरळ मध्ये हल्ल्यांचा कट करत असल्याचे दिसून आले आहे. केरळ मधील अनेकांचे इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत,अशी गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे. इराक आणि सीरिया मध्ये अतिरेक्यांना नुकतेच संपविण्यात आले आहे.
‘इसिस’चे १५ अतिरेकी लक्षद्वीपमध्ये घुसले?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 5:20 AM