साबरकांठा - गुजरातमधील साबरकांठा येथे 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी (1 ऑक्टोबर) खेळता खेळता हा चिमुकला बोअरवेलमध्ये पडला होता. बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याची गेले बारा तास मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र अखेर ती झुंज अपयशी ठरली आहे.
घरापासून काही अंतरावर खेळत असताना हा चिमुकला बोअरवेलमध्ये पडला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस, एनडीआरएफ आणि अहमदाबाद अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेगाने मदत कार्य करण्यास सुरुवात केली. साधारण 12 तास चिमुकल्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र यामध्ये चिमुकल्याचा मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वीच बिहारमधील मुंगेरमध्ये 45 फूट खोल बोअरवेलमध्ये सना नावाची एक चिमुकली पडली होती. मात्र 30 तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सनाला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आले होते.