..अन्यथा प्रदूषणाची स्थिती वाईट होईल
नवी दिल्ली : देशातील शहरांमधील हवेचे प्रदूषण असह्यतेच्या पातळीवर पोहोचत आहे व या प्रदूषणात रस्त्यांवरील वाहनांच्या धुराचा भाग मोठा आहे हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने १५ वर्षांहून जुन्या व्यापारी वाहनांची वाहतूक करण्यास येत्या १ एप्रिलपासून पूर्ण बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वाहन उद्योगालाही नवी चालना मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सचिव विजय छिब्बर यांनी एका पाश्चात्य वृत्तसंस्थेस ही माहिती देताना सांगितले की, सरकार सर्व प्रकारच्या व्यापारी वाहनांसाठी कमाल आयुर्मान १५ वर्षांचे करणार आहे.या संबंधीचा अधिकृत आदेश येत्या १० दिवसांत जारी केला जाईल व त्यानुसार १५ वर्षांहून अधिक जुन्या व्यापारी वाहनांवर येत्या १ एप्रिलपासून बंदी लागू होईल. काही तरी खंबीर उपाय योजले नाहीत तर भविष्यात प्रदूषणाची स्थिती आणखी वाईट होईल, अशी चिंताही छिब्बर यांनी व्यक्त केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)२७ लाख ट्रकवर गंडांतररस्ते वाहतूक मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या वाहन नोंदणीच्या आकडेवारीनुसार सध्या देशात १५ वर्षांहून अधिक जुने असलेले २७ लाख ट्रक रस्त्यांवर धावत आहेत. १ एप्रिलपासून खरंच बंदी लागू झाल्यास या ट्रकवर गंडांतर येईल. दीर्घकाळ मंदी सोसत असलेल्या वाहन उत्पादन उद्योगास यामुळे चांगले दिवस येतील. कारण लाखो नव्या व्यापारी वाहनांची मागणी एकदम तयार होईल.जगभरातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी १३ शहरे भारतातील आहेत. दिल्लीतील प्रदूषण सर्वात जास्त आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने गेल्यावर्षी जाहीर केले होते. त्यानंतर दिल्लीतील परिस्थिती आणखी वाईट झाली असून दिल्लीत प्रवेश करणाऱ्या ट्रकना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने ‘प्रदूषण शुल्क’ लागू केले आहे. राजधानीच्या काही अतिप्रदूषित भागांत दिवसाच्या ठराविक वेळांत वृद्ध व लहान मुलांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्याचा विचारही न्यायाधिकरण करीत आहे. इतर शहरांमधील परिस्थिती दिल्लीएवढी हाताबाहेर गेलेली नसली तरी सुखावह नक्कीच नाही.दिल्लीतील ‘सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायर्नमेंट’ने (सीएसई) केलेल्या अभ्यासानुसार जुनी आणि योग्य देखभाल न केली गेल्याने धुराचे लोट सोडत रस्त्यांवरून वाहणारी वाहने हे विशेषत: शहरांमधील हवेच्या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण आहे. यातही ट्रकमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण ३० टक्के आहे.वाहतूकदार नाराजपर्यावरणप्रेमींनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी माल वाहतूकदारांनी मात्र नाराजीचा सूर काढला. व्यापारी वाहनांचे कमाल आयुष्य केवळ वयावर ठरविणे अन्यायकारक आहे. तुलनेने कमी वयाची वाहनेही योग्य व वेळच्या वेळी देखभाल न केल्याने जास्त प्रदूषण करतात, हे लक्षात घ्यायला हवे. वाहनांची देखभाल करण्यास प्रोत्साहन मिळेल याचेही उपाय योजायला हवेत. धुरामुळे होणारे प्रदूषण हे केवळ वाहनाच्या वयावर अवलंबून नाही. वाहनांवरील कर आणि पार्किंग शुल्क वाढविणे व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यक्षम करून विस्तारित करणे असे उपाय एकात्मिक पद्धतीने राबविण्याची गरज आहे.-विवेक चट्टोपाध्याय, प्रदूषण तज्ज्ञ, सीएसई