गुवाहाटी- एखादी गोष्ट करण्याचा निश्चय केला की माणूस ती पूर्ण करण्यासाठी झटतो व यश संपादन करतोच हे आपण नेहमी ऐकलं आहे. पण या वाक्याची प्रचिती आसाममध्ये आली आहे. आर्मीतील एका जवानाने शरीरावरील गंभीर जखमा बऱ्या करून 15 वर्षांनी क्नुकल पुश अप्स करण्याचा विश्व विक्रम केला आहे. या जवानाने एका पायावर तसंच पाठीवर 40 एलबीएस वजनाची प्लेट ठेवून 55 पुश अप्स केले. हा जवान खाणकाम करत असताना गंभीर जखमी झाला होता. शरीरावरील त्या जखमा बऱ्या करत त्याने 15 वर्षांनी हा रेकॉर्ड केला आहे. लान्स लायक देश दीपक आसामच्या बक्सामध्ये 15 जाट रेजिमेंटमध्ये कार्यरत आहेत. देश दीपक यांनी युएईच्या जारजीस यांचा विक्रम तोडला आहे. जारजीस यांनी ऑगस्ट 2017मध्ये 49 क्नुकल पुश अप्सचा रेकॉर्ड केला होता.
देश दीपक यांच्या नावे इतरही रेकॉर्ड्स आहेत. आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये एका मिनिटात 51 क्नुकल पुश अप्स करून नावाची नोंद केली आहे. तर 52 क्नुकल पुश अप्स करून त्यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव निश्चित केलं आहे. 2003 साली जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये खाणकाम करत असताना दीपक जखमी झाले होते.