नवी दिल्ली - आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर ईडीची धाड पडली आहे. दिल्लीच्या पॉश न्यू फ्रेंड्स कॉलनीत तेजस्वी यादव यांचा ४ मजली बंगला केवळ ४ लाखात खरेदी केला होता. सध्या या बंगल्याची किंमत बाजारभावानुसार १५० कोटी रुपये आहे. ही संपत्ती एबी एक्सपोर्ट्स लिमिटेड नावाने नोंदणीकृत आहे. सध्या यावर तेजस्वी यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांचे नियंत्रण आहे.
तपास यंत्रणेनं म्हटलं की, ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोकड अथवा बेनामी उत्पन्नाचा वापर करण्यात आला आहे. काही मुंबईस्थित संस्थांकडून रत्ने आणि दागिन्यांचा व्यवहार करायचा होता, ज्यासाठी चुकीच्या पद्धतीने मिळवलेले पैसे वापरले गेले. कागदावर मालमत्ता एबी एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एके इन्फोसिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड कार्यालयाच्या नावाने दाखवली आहे. परंतु तेजस्वी यादव याचा वापर राहण्यासाठी करत आहेत. इतकेच नाही तर छापेमारीवेळी तेजस्वी यादव या बंगल्यात राहत होते. त्याचा वापर कुटुंबाच्या निवासासाठी केला जात होता असं त्यांनी सांगितले.
१ कोटी रोकड आणि सव्वा कोटीचं सोनेईडीने नोकरीच्या बदल्यात जमीन व्यवहाराची चौकशी करताना १ कोटी बेनामी रोकड, १९०० डॉलर, ५४० ग्राम गोल्ड बुलियन आणि १.५ किलोपेक्षा जास्त सोने (ज्याची किंमत १.२५ कोटी), परदेशी चलन जप्त केले आहे. तपास यंत्रणांनी लालूप्रसाद यादव कुटुंबातील सदस्य आणि अज्ञातांच्या नावे असलेल्या विविध संपत्ती, मालमत्तेचे कागदपत्रे जप्त केले आहेत.
त्याचसोबत जवळपास ६०० कोटी बेनामी संपत्तीचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत. त्यामध्ये ३५० कोटी रुपयांच्या स्थिर मालमत्तेचा समावेश आहे. विविध बेनामीदारांच्या माध्यमातून २५० कोटींचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. रेल्वेत नोकरीच्या बदल्यात तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव आणि कुटुंबाने पटणा तसेच अन्य भागात अनेक जमिनी बेकायदेशीररित्या अधिग्रहण केल्या. ज्याची सध्या किंमत २०० कोटी रुपयांहून अधिक आहे. या जमिनीवर अनेक बेनामीदार, शेल संस्था आणि लाभार्थी ओळखले गेले आहेत.
रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमिनी घेतल्यादरम्यान, लालूप्रसाद यादव कुटुंबीयांनी ग्रुप-डी अर्जदारांकडून केवळ ७.५ लाख रुपयांना चार भूखंड घेतले आणि राबडी देवी यांनी संगनमताने ते माजी आरजेडी आमदार सय्यद अबू दोजाना यांना ३.५ कोटी रुपयांना विकले. या रकमेतील मोठा हिस्सा तेजस्वी यादव यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचा आरोप एजन्सीने केला आहे. गरीब उमेदवार आणि त्यांच्या पालकांकडून रेल्वेतील ग्रुप डी नोकऱ्यांच्या बदल्यात जमिनी घेण्यात आल्या. अनेक रेल्वे झोनमध्ये भरती झालेल्या उमेदवारांपैकी ५०% पेक्षा जास्त उमेदवार लालूप्रसाद यादव यांच्या मतदारसंघातील होते. लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रिअल इस्टेटसह विविध क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीचा तपास सुरू आहे.