हैदराबाद - देशात कोरोना संक्रमितांचा आकडा कमी होत असून दुसरी लाट ओसरल्याचे आकडेवाडीवरुन दिसून येत आहे. दुसरीकडे, कोरोनाला पराभूत करण्यासाठी देशात लसीकरण अभियानही वेगात सुरू आहे. देशात आतापर्यंत 13 कोटीहून अधिक नागरिकांना कोरोना लशीचा डोस देण्यात आला आहे. मात्र, या लशींच्या किंमतीवरुन नेहमीच लस बनविणाऱ्या कंपन्या चर्चेत राहिल्या आहेत. देशात सीरम इंस्टीट्यूट आणि भारत बायोटेककडून कोरोनाची लस बनविण्यात आली आहे.
कोरोनावरील कोव्हॅक्सीन ही अधिकांश व्हेरिएन्टवर प्रभावशाली आहे, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आपल्या रिसर्चमध्ये म्हटले आहे. (CoronaVaccine: Covaxin is effective on most variants of corona says icmr). त्यामुळे, कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी नागरिक स्वत:हून पुढाकार घेत आहेत. मात्र, आता कोव्हॅक्सीन लशीची किंमत वाढविण्यासंदर्भात भारत बायोटेकने केंद्राशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामध्ये, 150 रुपये किंमत जास्त काळ टीकवणे शक्य नसल्याचं म्हटलं आहे.
केंद्र सरकारला कोव्हॅक्सीन लसीचा डोस प्रति लस 150 रुपये दराने जास्त काळापर्यंत परवडणारा नाही. त्यामुळे, खासगी बाजारात प्रतिस्पर्धी कंपनींच्या दरांसोबत या किंमतीने लशींची पूर्ततात जास्त काळ टिकू शकणार नाही, असे भारत बायोटेकने म्हटलं आहे. कंपनीने कोव्हॅक्सीन उत्पादनासाठी, क्लिनिकल चाचण्यांसाठी आणि उत्पादन सुविधांसाठी आतापर्यंतच्या स्वत: च्या संसाधनांमधून 500 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्याचेही कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, सध्या केंद्र सरकारला कोव्हॅक्सीन आणि कोविशिल्ड या दोन्ही लशींचे डोस 150 रुपये प्रती डोस दराने कंपन्यांकडून विक्री करण्यात येत आहेत. मात्र, हा दर जास्त काळापर्यंत परवडणारा नसल्याचे कंपनीने केंद्र सरकारले सांगितले आहे.
खासगी रुग्णालयात 1410 रुपयांना कोव्हॅक्सीन लस
खासगी रुग्णालयांमध्ये दिली जाणारी कोव्हॅक्सिनची लस ही सध्याची भारतात विक्री होणारी कोरोनाची सर्वात महागडी लस ठरली, असा सवाल सोशल मीडियावरून केला जातोय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं 8 जून रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशामध्ये कोव्हॅक्सिनचे दर 1200 रुपये एवढे निश्चित करण्यात आले आहेत. त्यावर 60 रुपये जीएसटी आणि 150 रुपये सेवा शुल्क लावल्यानंतर खासगी रुग्णालयांना या लशीसाठी 1410 रुपये मोजावे लागणार आहे. तर कोविशिल्डचे दर 780 रुपये आणि स्पुटनिक-व्ही चे दर 1145 रुपये असणार आहेत.
कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएन्टचा सामना करण्याची क्षमता
आयसीएमआरने आपल्या संशोधनात दावा केला आहे, की कोव्हॅक्सीन कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएन्टचा सामना करू शकते. एवढेच नाही, तर ही व्हॅक्सीन कोरोनाच्या डबल म्यूटेंट स्ट्रेनचाही सामना करण्यात सक्षम आहे, असेही आयसीएमआरने म्हटले आहे. हैदराबाद येथील भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सीन (COVAXIN) नावाची लस ही आतापर्यंत स्वदेशात तायर झालेली एकमेव लस आहे.