श्रीनगर : हिवाळा तोंडावर आला असून सीमेपलीकडून सुमारे १५० दहशतवादी काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांचे असे प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असा इशारा सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिला.
बीएसएफचे महानिरीक्षक (काश्मीर फ्रंटियर) अशोक यादव यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या संभाव्य घुसखोरीसंदर्भात विविध सूत्रांकडून गोपनीय माहिती मिळाली आहे. सीमेवर कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून बीएसएफ सतर्क असून लष्कराच्या सहकार्याने उपाययोजना केल्या आहेत. सध्या भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यास दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांची संख्या १३० ते १५० इतकी आहे.
निवडणूक काळातही हाेते धाेक्याचे इशारे...
अशोक यादव म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये निष्पक्ष आणि शांततामय वातावरणात विधानसभा निवडणुका पार पाडण्यासाठी सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि प्रशासनाशी समन्वय साधून आपले कर्तव्य बजावले. अनेकदा धोक्याचे इशारे देण्यात आले होते. मात्र, योग्य नियोजन राखून आम्ही कोणतेही दहशतवादी हल्ले होऊ दिले नाहीत व निवडणुका यशस्वीरीत्या पार पडल्या. हिवाळा सुरू होण्यापूर्वी दहशतवादी अनेकदा घुसखोरीचे प्रयत्न करतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आम्ही सीमाभागावर बारीक लक्ष ठेवत आहोत, असे त्यांनी सांगितले.
महिला सैनिक रोखताहेत अमली पदार्थ
अमली पदार्थांची नियंत्रण रेषेपलीकडून तस्करी होत असून, त्याचा वापर दहशतवादी हल्ल्यांसाठी करण्यात येतो. नियंत्रण रेषेवर तंगधार आणि केरनसारखी काही संवेदनशील क्षेत्रे आहेत. अमली पदार्थांची भारतीय हद्दीत तस्करी करण्याचे काम काही महिलांकरवी देखील केले जाते, असे आढळून आले आहे. त्यामुळे ही तस्करी रोखण्यासाठी महिला सैनिक तैनात करण्यात आले आहेत. याचा चांगला परिणाम झाला आहे. अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. (वृत्तसंस्था)