नवी दिल्ली : सन १९८० पासून गत ३५ वर्षांत नक्षली हिंसाचारात ३ हजार सुरक्षा जवानांसह एकूण १५ हजारांवर लोक मृत्युमुखी पडले आहेत.माहिती अधिकार कायद्याअंतर्गत एका अर्जाच्या उत्तरादाखल केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे. गत ३५ वर्षांत नक्षल्यांनी १२,१७७ नागरिकांचा बळी घेतला. शिवाय नक्षल्यांशी चार हात करताना ३१२५ सुरक्षा जवान शहीद झाले. याउलट १९८० ते ३१ मे २०१५ या काळात ४७६८ नक्षल्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले.माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दाखल अन्य एका अर्जाला उत्तर देताना गृहमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गत तीन वर्षांत पोलीस दलाच्या आधुनिकीकरणापोटी विविध राज्यांना ३,०३८.८६ कोटी रुपयांचा निधी दिला गेला. २०१२-१३ आणि २०१४-१५ या वित्तीय वर्षांत आंध्र प्रदेशला पोलीस दल आधुनिकीकरण योजनेअंतर्गत १६१ कोटी रुपये दिले गेले. उत्तर प्रदेशला ३७७ कोटी रुपये, तर छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांना अनुक्रमे ७३ कोटी व ६९ कोटी रुपयांचे वाटप केले गेले. गुजरातला १६४ कोटी, जम्मू-काश्मीरला २२८ कोटी, कर्नाटकला २०० कोटी, मध्यप्रदेशला १३३ कोटी, तर महाराष्ट्राला १९९ कोटी रुपये दिले गेले. ओडिशा, राजस्थान व तामिळनाडू या तीन राज्यांनाही अनुक्रमे १०० कोटी, १८१ कोटी आणि १७३ कोटी रुपये जारी केले गेले. आंध्रचे विभाजन होऊन अस्तित्वात आलेल्या नवनिर्मित तेलंगण राज्याला २०१४-१५ या वित्तीय वर्षात ६८.१३ कोटी रुपये दिले गेले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
३५ वर्षांत १५ हजारांवर मृत्युमुखी
By admin | Published: June 14, 2015 11:58 PM