चंढीगड - हरियाणातील ४६ हजाराहून अधिक उमेदवारांनी हरियाणा स्किल एम्प्लॉयमेंट कॉर्पोरेशनच्या कंत्राटी सफाई कामगार पदासाठी अर्ज केला आहे. या उमेदवारी अर्जात मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षित युवकांचा समावेश आहे. १५ हजार रुपये पगार असणाऱ्या या नोकरीसाठी पदवीधर आणि पदव्युत्तर युवकांनी अर्ज भरले आहेत. ६ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत ३९,९९० पदवीधर आणि ६११२ हून अधिक पदव्युत्तर युवकांनी या नोकरीसाठी अर्ज दाखल केलेत ज्याचा पगार १५ हजार दरमहिना आहे.
हरियाणाच्या सरकारी विभागांमध्ये याआधी कॉन्टॅक्टच्या आधारे कर्मचाऱ्यांची भरती ठेकेदाराच्या माध्यमातून व्हायची परंतु भाजपा सरकारच्या कार्यकाळात हरियाणा स्किल एम्प्लॉयमेंट कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली. आता या माध्यमातून सरकारी खात्यात, महापालिकेत इतर महामंडळात कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती केली जाते. हे कॉर्पोरेशन वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज मागवले जातात. सफाई कामगारांच्या भरतीसाठी इतक्या प्रमाणात अर्ज आल्याने अधिकारीही हैराण आहेत.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, अर्जदारांनी चुकून या नोकरीसाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता फार कमी आहे कारण नोकरीच्या जाहिरातीत स्पष्टपणे कोणत्या पदासाठी आणि कामाचे स्वरुप काय हे अधोरेखित करण्यात आले होते असं त्यांनी म्हटलं.
नोकरीच्या अटी काय?
जाहिरातीनुसार, स्वच्छता कामगार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एक प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे. त्यात त्यांनी नोकरीसाठी दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचली आहे. ज्यात सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, इमारतीत स्वच्छता करणे, झाडू मारणे आणि कचरा उचलणे या कामांचा उल्लेख आहे. त्यासोबतच जर उमेदवाराची निवड झाली तर त्याला त्याच्या जिल्ह्यातच नियुक्ती केली जाईल असंही जाहिरातीत दिलं आहे.
बेरोजगारीत वाढ
हरियाणात बेरोजगारीचा दर वाढलाय हे केंद्र सरकारच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. हरियाणातील शहरी भागात १५ ते २९ वर्ष वयोगटातील बेरोजगारीचा दर एप्रिल ते जून २०२४ या तिमाही वाढून ११.२ टक्के झाला आहे. हा दर जानेवारी ते मार्च या काळात ९.५ टक्के होता. तर १५ ते २९ वर्ष वयोगटातील महिलांचा बेरोजगारी दर जानेवारी ते मार्च १३.९ टक्के या तुलनेत वाढून एप्रिल ते जून १७.२ टक्के इतका झाला आहे.