अहमदाबाद - गुजरातमध्ये गेल्या 2 वर्षात 15 हजारांपेक्षा जास्त नवजात शिशूंचा केअर युनिटमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मंगळवारी गुजरात विधानसभेत राज्य सरकारने ही माहिती दिली. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमधील सिक न्यू बॉर्न केअर युनिटमध्ये समप्रमाणात नवजात बालकांचा वेगवेगळ्या उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासाला काँग्रेस आमदाराने याबाबतचा प्रश्न विचारला होता. त्यावर, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री नितीन पटेल यांनी उत्तर दिले. राज्यात 1.06 लाख नवजात बालकांना सन 2018 व 19 या कालावधीत केअर युनिटमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यापैकी 15,013 बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच, 1.06 लाख नवजात शिशूंपैकी 71,774 बालकांचा जन्म हा सरकारी रुग्णालयात झाला होता. मात्र, पुढील उपचारासाठी त्यांना सिक न्यू बॉर्न केअर युनिटमध्ये पाठविण्यात आले होते. तसेच, इतरत्र ठिकाणी/ खासगी रुग्णालयात जन्मलेल्या 34,727 बालकांनाही केअर युनिटमध्ये पाठविण्यात आले होते, असे पटेल यांनी सांगितले.
दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या बालकांपैकी अहमदाबाद येथे सर्वाधिक 4,322 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर, वडोदरा (2,362) आणि सुरतमध्ये (1,986) चिमुकल्यांनी आपला जीव गमावला आहे. याची दखल घेऊन सरकारने केअर युनिटमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची उपचारपद्धती पुरविण्यात येत आहे. तसेच, या युनिटमध्ये तज्ञ बाल चिकित्सक, नर्स आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरतीही करण्यात आल्याचे पटेल यांनी सांगितले.