नवी दिल्ली : केंद्र सरकारने दसरा आणि दिवाळीच्या सणासुदीच्या हंगामात जोरदार कमाई केली आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्ये १.५२ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. हे आतापर्यंतचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे जीएसटी संकलन ठरले आहे. सणासुदीच्या हंगामातील आर्थिक घडामोडीचे प्रतिबिंब या आकड्यात दिसत असून या संकलनामध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे.
भारत सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमधील १.३० लाख कोटी रुपयांच्या जीएसटी संकलनाच्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलनात १६.६ टक्के वाढ झाली आहे. यंदाच्या एप्रिलमध्ये १.६८ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. हा संकलनाचा सार्वकालिक उच्चांक आहे.
सप्टेंबरमध्ये ते १.४८ लाख कोटी रुपये होते. सलग आठ महिने जीएसटी संकलन १.४० लाख कोटींहून अधिक राहिले आहे.ऑक्टाेबरमधील संकलनात केंद्रीय जीएसटी २६,०३९ कोटी, राज्य जीएसटी ३३,३९६ कोटी, एकात्मिक जीएसटी ८१,७७८ कोटी (आयात वस्तूंवरील ३७,२९७ कोटींसह) आणि अधिभार १०,५०५ कोटी रुपये अशी विभागणी आहे.
पेट्राेल, डिझेल विक्रीही वाढली
ऑक्टाेबर महिन्यात इंधनाची मागणीही प्रचंड वाढली. या महिन्यात पेट्राेलची विक्री २७.८ लाख टन, तर डिझेलची विक्री ६५.७ लाख टन एवढी राहिली. त्यात सरासरी १२ टक्के वाढ झाली आहे.
८ महिने संकलन १.४० लाख काेटींवर
हंगामी समायोजनानंतर ऑक्टोबर २०२२ मधील सीजीएसटी ७४,६६५ कोटी रुपये व एसजीएसटी ७७,२७९ कोटी रुपये राहिला. मागील सलग ८ महिन्यांपासून जीएसटी संकलन १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक, तर २ महिन्यांत ते १.५० लाख कोटींवर राहिले आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये ८.३ कोटी ई-वे बिले तयार झाली. ऑगस्ट २०२२ मध्ये हा आकडा ७.७ कोटी होता.
नोव्हेंबरमध्ये संकलन वाढणार ?
‘आयसीआरए’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी सांगितले की, सणासुदीच्या हंगामाच्या तोंडावर जीएसटी ई-वे बिलांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जीएसटी संकलन वाढले आहे. नोव्हेंबर २०२२ मध्येही ई-वे बिले उच्च पातळीवर राहतील, अशी अपेक्षा आहे.