शिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुका ९ नोव्हेंबर रोजी होत असून, त्यासाठी १५८ करोडपती उमेदवार रिंगणात आहेत आणि ६१ जणांविरुद्ध फौजदारी खटले दाखल आहेत. हिमाचल प्रदेश इलेक्शन वॉच अॅण्ड असोसिएट्स फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मसने (एडीआर) ही माहिती दिली आहे. रिंगणात असलेल्या ३३८ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांतून हे समोर आले आहे.एकूण ३३८पैकी १५८ उमेदवार (४७ टक्के) उमेदवार करोडपती असून, उमेदवारांची सरासरी संपत्ती ४.०७ कोटी रुपये आहे. त्यात काँग्रेसच्या ५९, भाजपाच्या ४७ व बसपाच्या ६ जणांचा समावेश आहे. पाच जणांचे वार्षिक उत्पन्न १ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. काँग्रेसचे उमेदवार जी.एस. बाली यांचे वार्षिक उत्पन्न ३.४२ कोटी रुपये आहे. अन्य कोट्यधीश उमेदवारांत राजेश शर्मा, भाजपाचे बलवीरसिंग वर्मा, महेंदर सिंह व मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)कोटीच्या कोटी उड्डाणेकाँग्रेसच्या ६८ उमेदवारांची सरासरी संपत्ती ८.५६ कोटी, तर भाजपाच्या ६८ उमेदवारांची सरासरी संपत्ती ५.३१ कोटी व बसपाच्या ४२ उमेदवारांची संपत्ती ४६.७८ लाख रुपये आहे. माकपच्या १४ उमेदवारांची सरासरी संपत्ती २.३१ कोटी, भाकपच्या ३ उमेदवारांची सरासरी संपत्ती ७४.६४ लाख आणि अपक्ष ११२ उमेदवारांची संपत्ती ३.२० कोटी रुपये आहे. काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांची संपत्ती ८४ कोटी रुपये आहे.५५ लाख रुपये हस्तगत : निवडणुकीच्या घोषनेनंतर निवडणूक आयोगाने ५५ लाख रुपये रोख, २,३२२ लिटर दारू तसेच गांजा व ड्रग्ज मोठ्या प्रमाणात जप्त केले आहेत. निवडणूक आयोगाने २०४ पथके तयार केली आहेत. प्रत्येक मतदारसंघात तीन पथके, तीन तपास पथके तैनात आहेत. या निवडणुकीसाठी एक प्राप्तिकर अतिरिक्त आयुक्त, सहा उपायुक्त व उप संचालक, १७ प्राप्तिकर अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.गुन्हे दाखल झालेले३३८ उमेदवारांपैकी ६१ जणांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी ३१ जणांवर (९ टक्के) गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे आहेत. गुन्हे दाखल असणाºयांत काँग्रेसचे ६, भाजपाचे २३, बसपाचे ३, माकपचे १० आणि १६ अपक्ष आहेत.१२० उमेदवार५वी ते १२वी पासएकूण उमेदवारांपैकी १२० उमेदवार हे ५वी ते १२वीपास आहेत. तर, २१४ पदवीधर आहेत. एक उमेदवार निरक्षर असून एका उमेदवाराने आपली शैक्षणिक माहिती दिली नाही. १५५ उमेदवार २५ ते ५० या वयोगटातील आहेत. तर,१७९ उमेदवार ५१ ते ८० वयोगटातील आहेत. १९महिला उमेदवार निवडणूक लढवित आहेत.- पंतप्रधान मोदी व राहुल गांधी दोघेही या राज्यामध्ये सतत दौरे करून सभा घेत आहेत. मात्र भाजपाने येथे पूर्ण ताकद लावल्याचे दिसत आहे.
हिमाचल प्रदेशातील निवडणुकीच्या रिंगणात १५८ उमेदवार करोडपती; ६१ जणांवर खटले, १५५ जण २५ ते ५० या वयोगटातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 1:16 AM