नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यातील सांज दरी येथे बसचा भीषण अपघात झाला आहे. शंशारवरून सांजकडे जात असलेली एक खासगी बस जंगला या गावाजवळील दरीत कोसळली. सकाळी साडे आठ वाजता झालेल्या या अपघातात शाळकरी मुलांसह १६ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळावरील दृश्यामध्ये बस पूर्णपणे चक्काचूर झाल्याचे दिसून आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये किमान ४० विद्यार्थी होते. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी घटनास्थळी घेतली धाव
कुल्लूचे उपायुक्त आशुतोष गर्ग यांनी म्हटले की, सांजवरून निघालेली बस जंगला या गावाजवळील दरीत सकाळी सुमारे साडे आठच्या सुमारास कोसळली. या अपघाताची माहिती मिळताच जिल्ह्यातील अधिकारी आणि बचाव दलाने घटनास्थळी तत्काळ धाव घेतली आणि जखमींना जवळ असलेल्या एका रूग्णालयात दाखल केले, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
राष्ट्रपतींकडून तीव्र शोक व्यक्त
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या घटनेवर घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेल्या बस दुर्घटनेत विद्यार्थ्यांसह १६ जणांचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी ऐकून मन व्यथित झाले. या दुर्घटनेत ज्यांनी आपली मुले आणि प्रियजन गमावले त्यांच्या कुटुंबांप्रती माझ्या संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी केली.
पंतप्रधानांकडून आर्थिक मदत जाहीर
पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी यांनी म्हणाले, “हिमाचल प्रदेशामधील कुल्लू येथे झालेला बस अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या दु:खद प्रसंगी माझ्या शोकसंवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. मला आशा आहे की, जे जखमी झाले आहेत, ते लवकर बरे होतील. स्थानिक प्रशासन बाधित लोकांना शक्य तेवढी मदत करेल.” दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाईकांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच प्रत्येक जखमीला ५० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
मृतांच्या नातेवाईकांना ५-५ लाख देण्याची घोषणा
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, कुल्लू येथील सांज दरीत एक खासगी बस कोसळल्याची दु:खद बातमी मिळाली. संपूर्ण प्रशासन घटनास्थळी आहे, जखमींना रुग्णालयात नेले जात आहे. ईश्वर या घटनेतील मृतांच्या आत्म्याला शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना शक्ती देवो. दुसरीकडे, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, कुल्लूचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहेत. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये आणि जखमींना १५ हजार रुपये तत्काळ देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्राकडून मदत जाहीर केल्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकूर यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.