भोपाळ : नामिबियावरून आठ चित्ते घेऊन येणारे विशेष मालवाहू विमान उद्या, शनिवारी राजस्थानमधील जयपूरऐवजी आता मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे उतरणार आहे. हे विमान भारतात येण्याच्या एक दिवस आधी पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यानंतर हे आठ चित्ते ग्वाल्हेरहून भारतीय हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरने मध्य प्रदेशातील श्यापूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात नेले जाणार आहेत.
या आठ चित्त्यांसाठी कुनो राष्ट्रीय उद्यानात विशेष क्षेत्र तयार करण्यात आले आहे. नामिबियाहून आल्यानंतर चित्त्यांना काही काळ क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येईल. त्यापैकी तीन चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शनिवारी १७ सप्टेंबर रोजी विशेष क्षेत्रात सोडणार आहेत. त्याशिवाय अन्य पाच चित्त्यांनाही त्यांच्यासाठी बांधलेल्या विशेष क्षेत्रात ठेवण्यात येईल. या चित्त्यांना ग्वाल्हेरहून हेलिकॉप्टरद्वारे कुनो राष्ट्रीय उद्यानात नेले जाईल अशी माहिती प्रधान मुख्य वन संरक्षक (पीसीसीएफ) जे. एस. चौहान यांनी दिली.
पाच मादी व तीन नर चित्तेनामिबियातून भारतात आणल्या जाणाऱ्या आठ चित्त्यांमध्ये पाच मादी व तीन नर आहेत. त्यापैकी पाच मादी चित्त्यांचे वय दोन ते पाच वर्षे दरम्यान तर तीन नर चित्त्यांचे वय ४.५ ते ५.५ वर्षे दरम्यान आहे, अशी माहिती चित्ता कॉन्झर्व्हेशन फंड (सीसीएफ) या स्वयंसेवी संस्थेने दिली.