पावसाचे थैमानइटानगर : अरुणाचल प्रदेशच्या तवांग जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे कामगारांच्या शिबिरावर दरडी कोसळल्याने किमान १६ जण ठार झाले.पोलीस अधीक्षक अँटो अलफांसे यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, तवांगपासून ६ किमी अंतरावरील फामला गावात पहाटे ३ वाजताच्या सुमारास दरड कोसळली. त्या वेळी १९ कामगार त्या शिबिरात वास्तव्याला होते. हे कामगार जवळीलच एका बांधकामासाठी येथे आले होते. ढिगाऱ्यातून आतापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, एका गंभीर जखमीस उपचारासाठी शेजारील आसामच्या तेजपूर येथील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. लष्कर, प्रशासन, पोलीस आणि गावकऱ्यांनी संयुक्तपणे बचाव मोहीम राबवून सर्व मृतदेह बाहेर काढले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी तवांगमधील भूस्खलन तसेच चांगलांग व इतर काही जिल्ह्यांत आलेल्या पुरानंतर मुख्यमंत्री कलिखो पुल यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला.
अरुणाचलमध्ये दरड कोसळून १६ कामगार ठार
By admin | Published: April 23, 2016 4:21 AM