हैदराबाद: गेल्या काही महिन्यांपासून तरुणाईला पबजी गेमनं अक्षरश: वेड लावलं आहे. कित्येक तरुण भान विसरून दिवसभर पबजी खेळत असतात. पबजीचं हे व्यवन अतिशय घातक आहे. अनेक दिवस देहभान विसरून पबजी खेळणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. पबजीसाठी तहानभूक बाजूला ठेवलेल्या एका १६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातल्या द्वारका तिरुमलामध्ये ही धक्कादायक घटना घडली.द्वारका तिरुमलामधल्या जुज्जुलाकुंटा येथील १६ वर्षीय तरुण गेल्या काही दिवसांपासून सतत पबजी खेळत होता. कोरोनाचा धोका वाढल्यानं बाहेर जाणं शक्य होत नाही. त्यामुळे तो मोबाईलवर पबजी खेळत बसला. तरुणाला पबजीच्या नादात तहानभूकेचंही भान राहिलं नाही. पाण्याचा एक घोट, अन्नाचा एक दाणाही पोटात न गेल्यानं तरुणाची प्रकृती बिघडली. त्याला डिहायड्रेशनचा त्रास झाला. मुलाची प्रकृती बिघडल्यानं कुटुंबीयांनी त्याला इलुरू शहरातील रुग्णालयात नेलं. त्यावेळी त्याची कोरोना चाचणीदेखील करण्यात आली. तिचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्याचा मृत्यू झाला. 'द हिंदू'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.पबजीच्या नादामुळे तरुणानं जीव गमावण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी सलग ६ तास पबजी खेळल्यानं एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशच्या निमचमध्ये घडली होती. बारावीत शिकणारा फुरखान कुरेशी सतत पबजी खेळत होता. २८ मे रोजी तो सतत सहा तास पबजी खेळला. 'दुपारी जेवणानंतर फुरखान पबजी खेळू लागला. सलग ६ तास तो खेळत होता. तो अतिशय चिडला होता. इतर खेळाडूंवर ओरडत होता. त्यानंतर तो कोसळला आणि हृदयक्रिया बंद पडल्यानं त्याचा मृत्यू झाला,' असं त्याचे वडील हारुन रशीद कुरेशींनी सांगितलं.
तहानभूक विसरून 'तो' काही दिवस सतत पबजी खेळत राहिला; १६ वर्षीय तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 11:26 PM